राजापूर : राजापूर तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजता जवळेथर परिसरात वीज पडून दोन कामगार गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. प्रकाश अंबाजी मोरे (वय ५२) आणि विलास शिवाजी धावडे (वय ४३) अशी जखमींची नावे आहेत.
राजापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. काही भागात मुसळधार, तर काही भागात हलक्या सरी कोसळत असताना, जोरदार विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहत आहेत. शुक्रवारी दुपारनंतर जवळेथर परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा शिडकाव झाला. त्यावेळी प्रकाश मोरे आणि विलास धावडे हे गावात बांधकाम करत असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले.
या दोघांनाही तातडीने जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची गंभीर प्रकृती पाहता, त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, तालुक्यातील होळी सडेवाडी येथेही वीज पडल्याने परिसरातील घरांमधील वीजेची उपकरणे नादुरुस्त झाली आहेत. यामुळे येथील ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून, सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:53 AM 17/May/2025













