रत्नागिरी एसटी आगारातून तुळजापूर, पुणेसह बोरिवली मार्गावर जादा फेऱ्या

रत्नागिरी : खास उन्हाळी हंगाम, पर्यटन व देवीच्या दर्शनाला जाण्याकरिता रत्नागिरी आगाराने तीन मार्गांवर फेऱ्या सुरू केल्या आहेत. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांना उन्हाळी हंगामात तुळजापूरला जाण्यासाठी रत्नागिरी एसटी आगाराने रत्नागिरी ते तुळजापूर या मार्गावर जादा फेरी सुरू केली आहे.

रत्नागिरीतून दररोज सकाळी ८.१५ वाजता बस सुटणार आहे. ही बस रत्नागिरीतून कोल्हापूर मार्गे सांगली, मिरज, पंढरपूर, सोलापूर व तुळजापूरला जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता सुद्धा जादा फेरी सोडण्यात येणार आहे. तसेच भाविकांना परतीसाठीही दोन फेऱ्या ठेवल्या आहेत. यामध्ये तुळजापूरमधून सकाळी ७.३० वाजता व रात्री ८.३० वाजता फेरी सोडण्यात येणार असून, दुसऱ्या दिवशी ही फेरी रत्नागिरीत पोहोचणार आहे. साध्या दरात, पुशबॅक सीट व स्वतंत्र चार्जिंग सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.

रत्नागिरी आगाराने उन्हाळी हंगाम व चाकरमान्यांच्या सोयीकरिता जयगड ते बोरिवली ही एसटी फेरी सुरू केली आहे. ही फेरी जयगडमधून सुटून खंडाळा, जाकादेवी, निवळी, संगमेश्वर, चिपळूण, पनवेलमार्गे बोरिवलीला पोहोचणार आहे. जयगड येथून सायंकाळी ६ वाजता ही फेरी सुटेल. तर बोरिवलीमधून जयगडला येण्याकरिता रात्री ९ वाजता सोडण्यात येणार आहे.

याशिवाय पर्यटकांसाठी पुणे स्टेशन ते गणपतीपुळे ही नवीन फेरीही रत्नागिरी आगाराने सुरू केली आहे. पुणे स्टेशन येथून रात्री ८ वाजता ही फेरी सुटणार आहे. स्वारगेट, कराड, कोकरूड, मलकापूर, रत्नागिरी, आरेवारे व गणपतीपुळे, मालगुंड या मार्गावर फेरी चालवण्यात येणार आहे. तसेच गणपतीपुळ्यातून पुन्हा पुण्याला जाण्याकरिता सायंकाळी ७ वाजता ही फेरी मालगुंड येथून सुटेल. तसेच ही फेरी रत्नागिरी पोहोचेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 17/May/2025