खेडमधील १४ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

खेड : रखरखत्या उन्हामुळे ग्रामस्थ हैराण झाले असून टंचाईग्रस्त गाव वाड्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सद्यस्थितीत ११ गावांतील १४ वाड्यांना ८५५ ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण करत आहेत. प्रशासनाच्या ताफ्यांत एकच शासकीय टँकर आहे.

टंचाई आराखड्यात १९ गावे ४४ वाड्या समाविष्ट केल्या होत्या. यंदा टंचाई कृती आराखड्यातील बहुतांश गाव-वाड्या टंचाईमुक्त करण्यात येथील ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाला यश आले आहे. याचमुळे यंदा टंचाई आराखड्यात समाविष्ट एकाच टँकरवर प्रशासनाची मदार असलेल्या गाव वाड्यांव्यतिरिक्त अन्य नव्या गाव-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सर्वाधिक पाणीटंचाईची खळ घेरारसाळगड येथील ५ वाड्यांना बसत आहे. येथील २१२ ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रोश करत आहेत. याच गावातील बुथराईवाडी येथे तालुक्यातील पहिला टँकर धावण्यास सुरुवात झाली होती.

यापाठोपाठ गुणदे – काळकाईवाडी येथील १०१ ग्रामस्थांना टंचाईची झळ बसत आहे. खवटी खालची धनगरवाडी येथील ५५, चिरणी-धनगरवाडी ७५, खवटी-वरची धनगरवाडी ७५, सवेणी धनगरवाडी ३५, केळणे-मंगलेवाडी ६७, भोसलेवाडी ३९, कुळवंडी-शिंदेवाडी ५०, कळंबणी बुद्रुक दंडवाडी ८६, वावेतर्फे नातु देबेवाडी ४५, तिसंगी-खांडकरवाडी ४३ ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 17/May/2025