लांजा : येथील नगरपंचायत प्रशासनाकडून शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी प्लॅन) जाहीर करण्यात आल्यानंतर या आराखड्या विरोधात हरकती घेण्याची मुदत १५ मे पर्यंत होती. ती मुदत संपुष्टात आली असून १५०० हरकती अर्ज नगरपंचायती कार्यालयात आले आहेत.
शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी प्लॅन) जाहीर केल्यानंतर लांजा कुवे परिसरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. विकास आराखड्या संदर्भात लांजात संमिश्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत होत्या. एकीकडे विकास आराखड्याला जोरदार विरोध होत असताना दुसरीकडून विकास आराखड्याचे समर्थनही होताना पाहायला मिळाले होते.
लांजा शहराचा प्रारूप विकास आराखडा २७ मार्चला जाहीर करण्यात आला. या आराखड्याबाबत हरकती घेण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल होती. दरम्यान २६ एप्रिलला आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विकास आराखड्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक झाली. नागरिकांच्या रोषामुळे ही बैठक वादळी ठरली होती. त्यावेळी हरकती घेण्यासाठी असलेला कालावधी वाढवून १५ मेपर्यंत करण्यात आला होता. तो कालावधी काल संपुष्टात आला असून पंधराशे हरकती अर्ज आले आहेत. या संदर्भात पुढील सुनावणीकडे लांजावासीयांचे लक्ष आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 17/May/2025












