गणपतीपुळेत संकष्टी चतुर्थीला भक्तगणांची गर्दी

रत्नागिरी : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळ्यात दर्शनासाठी भक्तगणांची प्रचंड गर्दी होती. गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस पडूनही पर्यटकांचा उत्साह कमी झालेला नव्हता. काल दिवसभरात २५ हजार भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. वातावरण बिघडल्यामुळे समुद्राला उधाण आलेले होते. सुरक्षिततेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाण्यात जाऊ नये अशा सूचना किनाऱ्यावरील जीवरक्षक पर्यटकांना देत होते.

मे महिन्याच्या सुटीत आलेल्या संकष्टी चतुर्थीदिवशी मोठ्याप्रमाणात गर्दी झालेली होती. मुंबई-पुण्यासह बेळगाव, पश्चिम महाराष्ट्रातील भक्त दर्शनासाठी गणपतीपुळेमध्ये आलेले होते. श्रींची पूजा झाल्यानंतर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दर्शनासाठी पर्यटकांच्या दिवसभर रांगाच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी ४ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. यावेळी पुजाऱ्यांसह ट्रस्टी आणि भक्त सहभागी झालेले होते.

गुरुवारी रात्री पाऊस पडल्यामुळे गणपतीपुळेत रस्त्यावर पाणीच पाणी साचलेले होते. काही ठिकाणी चिखल झालेला होता. त्यामधुन मार्ग काढण्यासाठी पर्यटकाना कसरत करावी लागत होती. मात्र दर्शनासाठीची उत्सुकता असल्यामुळे तासनतास उभे राहून भक्तींनी दर्शन घेतले अनेक पर्यटक दर्शनाबरोबरच फिरण्यासाठी किनाऱ्यावर जात होते. पावसामुळे लाटांचा वेग वाढलेला होता. त्यामध्येही काही पर्यटक पोहण्यासाठी समुद्रात जात होते. उधाणामुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी किनाऱ्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

देवस्थान आणि ग्रामपंचायतीकडून नेमण्यात आलेले जीवरक्षकही पर्यटकांना समुद्रात जाऊ नये अशा सूचना देत होते. मंदिरासमोर आणि पोलीस दुरक्षेत्रामागील किनारी भागात चाळ (खड्डा) तयार होत असल्यामुळे भरतीच्यावेळी त्या परिसरात पोहण्यास मनाई करण्यात आलेली होती. चंद्रोदयापर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवण्यात आलेले होते.

संकष्टी असल्यामुळे नेहमीपेक्षा पर्यटकांची गर्दी अधिक होती. मात्र, पावसामुळे गावात फिरण्यात अडचणी आल्या. परजिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांमुळे लॉजिंग, हॉटेल्स् यासह किनाऱ्यावरील फेरीवाल्यांचा व्यवसाय चांगला झाला-कल्पेश सुर्वे, गणपतीपुळे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 17/May/2025