‘नरकातला स्वर्ग’ हे संजय राऊतांचे पुस्तक आज प्रकाशित होणार आहे, मात्र त्यापूर्वीच या पुस्तकावरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या पुस्तकामध्ये राऊतांनी गौप्यस्फोट केले असून त्यामुळे राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे.
आधी भाजप नेते, मग शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी राऊतांवर कडाडून टीका केलीच. मात्र त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. पाकिस्तान आणि संजय राऊत सारखेच आहेत, दोघेही व्हिक्टीम कार्ड खेळतात असे म्हणत देशपांडे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला.
मान ना मान मैं तेरा मेहमान
तसेच राज ठाकरे आपले मित्र आहेत, आपण तुरूंगात होतो तेव्हा त्यांनी एकदा फोन करायला हवा होता, अशी खंतही राऊंतानी व्यक्त केली होती. पण राज ठाकरे कधीच म्हणत नाहीत की राऊत माझे मित्र आहेत, मान ना मान मैं तेरा मेहमान। अशी त्यांची गत झाली आहे, असे म्हणत संदीप देशपांडेनी राऊतांना टोला हाणला.
” राज ठाकरे यांच्याबाबत संजय राऊत नेहमी म्हणतात की राज माझे मित्र आहे, हेच जवळ येतात. पण राज ठाकरे तर कधी बोलले नाही की ही माझे मित्र आहे. मान ना मान मैं तेरा मेहमान अशी त्यांची गत आहे. आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे, म्हणून त्यांना राज साहेबांची आठवण येते. पण आमच्या 16000 महाराष्ट्र सैनिकांवर कारवाई केली तेव्हा त्यांना मैत्री का नाही आठवली?. माझ्या 9 वर्षांच्या मुलाला प्रश्न विचारले तेव्हा कुठे होते? असं विचारत संदीप देशपांडेनी टीकास्त्र सोडलं.
संजय राऊत आणि पाकिस्तान एकाच माळेचे मणी
संजय राऊत यांनी लिहीलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकातील दाव्यांवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी बरीच टीका केली आहे. संजय राऊत आणि पाकिस्तान सारखेच आहेत. पाकिस्तानने स्वतः हल्ला केला आणि व्हिक्टीम कार्ड खेळतात, संजय राऊतही तसेच करत आहेत. ते स्वातंत्रसैनिक म्हणून स्वतःला दाखवत आहेत. पण ते आर्थिक घोटाळा प्रकरणी जेल मध्ये गेले होते, पण त्या आरोपांबाबात कोणतंही वक्तव्य त्यांनी पुस्तकात केलेलं नाही. पत्रा चाळ आरोपाखाली तुम्ही आत गेला होता, त्याबद्दल का लिहीलं नाही असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.
आता बाळासाहेब हयात नाहीत, या पुस्तकात राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल लिहीलं आहे. पण कोण होतं पाहायला? मी पुस्तक वाचलं नाही आणि विकत घेऊन पण वाचण्यासारखे नाही अशा शब्दांत त्यांनी विषय संपवला. माझी अजून ED इन्क्वायरी झाली नाही, आणि तशी होईल असे मी काही केले नाही असा टोलाही त्यांनी हाणला. मी काय राऊत यांच्यासारखा लेखक नाही, त्यामुळे अजून काही पुस्तक लिहिण्याचा विचार नाही, असेही देशपांडे म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 17-05-2025
