बारामती : राज्यातील ८ लाख ८ हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप आम्ही देत आहोत. यासाठी २४००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. १ लाख ३० हजार घरांसाठी ५०० मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा संच आम्ही बसवलेले आहेत.
येणाऱ्या काही काळात राज्यातील ग्राहकांचे ७० टक्के वीज बिल टप्प्याटप्प्याने कमी होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुढाळे (ता.बारामती)येथे ३३ /११ के व्ही. विद्युत उपकेंद्र भूमिपूजन पार पडले. यावेळी पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, ७० टक्के वीज बिल टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे. टेक्निकल लोकांनी आम्हाला सांगितले की, हे शून्यावर येणार आहे. पण मला ते ऐकून भीतीच वाटते. ते शून्यावर नाही आले म्हणजे लोक म्हणतात थापा मारतोय. पण आता शेतकऱ्यांचा आणि लोकांचा आपण फायदा करून देत आहोत असे त्यांनी सांगितले. बारामतीचा ग्रामीण आणि शहरी भाग बदलतोय. यंदाच्या वर्षी मान्सूनचं आगमन लवकर होणार आहे. त्यामुळे माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जे काही बीज बियाणं आणि खतं लागणार आहेत, ते आम्ही लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ. ज्या ठिकाणी पाणी नाही, त्याठिकाणी टँकरनं पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. आम्ही सोलर वीज उपलब्ध करून देत आहोत. या वीज उपकेंद्रामुळे मुढाळे परिसरात विजेची कमतरता भासणार नाही, हे वीज उपकेंद्राचं काम एक वर्षात पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे पवार म्हणाले. लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देत असल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट झाल्याचा दावा पवार यांनी केला.
मी परवा इलेक्ट्रिक ३२ लाखांची गाडी घेतली. कंपनीने ५०० किलोमीटरचा दावा केला आहे. पण साडेतीनशे किलोमीटर तर ती एकदा चार्ज केल्यावर चालते. मुंबईवरून यायचं इथं आपलं फुकट बारामतीमध्ये पोहोचायचं. महाराष्ट्रातील प्रत्येक पेट्रोल पंपावर आम्ही आता चार्जिंग स्टेशन करत आहोत. त्याशिवाय गत्यंतर नाहीये. काळानुरूप आपल्याला बदलावी लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 17-05-2025
