रत्नागिरी : वीज कंत्राटी कामगारांच्या खटल्याचा १० जूनला निकाल

रत्नागिरी : विद्युत सहायक भरतीप्रकरणी तब्बल १३ वर्षे सुरू असलेल्या ठाणे औद्योगिक न्यायालयातील खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. या खटल्याचा आता १० जून रोजी निकाल दिला जाणार आहे. हा निकाल काय लागतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सन २०१२ साली महावितरण कंपनीत ७००० विद्युत सहायक पदाची भरती निघाली होती. या भरतीमध्ये सर्व कार्यरत वीज कंत्राटी कामगारांना त्याच पदावर सेवेत कायम करून घ्यावे, अशी याचिका भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. राज्यभरातील १३६२ कामगार यात समाविष्ट आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण ठाणे औद्योगिक न्यायालयात वर्ग करण्यात आले. तेथे १३ वर्षे सुरू असलेल्या या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून, अंतिम निकाल दि. १० जून रोजी लागणार असल्याने वीज कंत्राटी कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णा देसाई यांचे संघटनेला मार्गदर्शन लाभले तर संघटनेच्या वतीने अॅड. विजय वैद्य यांनी १३ वर्षे न्यायालयात बाजू मांडली, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जयेंद्र थूळ यांनी दिली. या खटल्याच्या निकालाची तारीख जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांना या निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. या निकालाकडे त्यांचे लक्ष आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 17/May/2025