रत्नागिरी : जिल्ह्यातील २६०० हेक्टर लागवडीखाली आणणार

रत्नागिरी : जिल्ह्यात डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील २६०० हेक्टर पिकाखाली आणण्यासाठी ६५०० शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण ५२ शेतकरी गट तयार करण्यात आले असून, प्रत्येक गटात १२५ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. विषमुक्त शेतमाल उत्पादन या उद्देश्याने नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येत आहे. कृषी विभाग व ‘आत्मा’ यांच्या प्रयत्नातून नैसर्गिक शेती अभियान राबविताना विषमुक्त अन्नधान्य उत्पन्नावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.

रासायनिक खताचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात येत नैसर्गिक शेतीवर भर देण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात येत असून, त्यासाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टप्प्या-टप्प्याने शेतकरी सहभाग वाढवत नेत अधिकाधिक क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नैसर्गिक शेती अभियान
शाश्वत शेतीला चालना देणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे, जमिनीचे आरोग्य सुधारणे जैवविविधतेला प्रोत्साहन देणे या उद्देश्याने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येत आहे. नैसर्गिक घटकाचा वापर करून विषमुक्त शेतमाल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकरी स्वतःहून तयार होत आहेत.

नैसर्गिक शेतीचे फायदे
रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर न केल्यामुळे खर्च कमी होतो. जमिनीचे आरोग्य सुधारते. जैविक घटकांचा वापरामुळे मातीची सुपीकता वाढते.

नैसर्गिक शेतीसाठी संपर्क
जे शेतकरी किंवा त्यांचा गट नैसर्गिक शेती करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

५२ क्लस्टर
जिल्ह्यात एकूण ५२ शेतकरी गट /क्लस्टर तयार केले जाणार आहेत. एका गटात १२५ शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे.

नैसर्गिक शेती ही स्थानिक संसाधनांवर आधारित पर्यावरणपूरक व शाश्वत प्रणाली आहे. शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करून उत्पादन खर्चात बचत करावी. – शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 17/May/2025