रत्नागिरी : जिल्ह्यात चार महिन्यांत १२८८ जणांना श्वानदंश

रत्नागिरी : जिल्ह्यात श्वानदंश, सर्पदंश प्रमाण वाढले असून, गेल्या चार महिन्यांत १,२८८ जणांना श्वानदंश तर ११५ जणांना सर्पदंश झाला आहे. तसेच इतर प्राणी म्हणजेच विंचू, मांजर, माकड, गाढव आणि कोल्हा यांनीही लोकांना चावा घेतला आहे. श्वान, सर्प आणि इतर प्राण्यांनी एकूण २,६०३ जणांना चावा घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सापांच्या भीतीबरोबरच श्वानांची प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.

शहर आणि ग्रामीण भागात उनाड कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसतात. सध्या शहरांमध्ये कुत्र्यांच्या नसबंदीचे प्रयोग करण्यात येत आहे. त्याचबरोबर श्वानदंश, सर्पदंश आदीवरील जिल्ह्यात लस उपलब्ध आहे.

कुत्रा, साप चावले, तरी सर्व रुग्ण बचावले
जिल्ह्यात कुत्रे, साप तसेच इतर प्राण्यांकडून माणसांवर हल्ले करून चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे वेळीच उपचार करून सर्व रुग्णांना वाचविण्यात आले आहे.

२६०३ रुग्णांचा चार महिन्यात कुत्रे, साप, विंचू, मांजर, उंदीर, गाढव, माणूस, माकड, कोल्हा व इतर प्राण्यांनी चावा घेतला. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात आलेले आहेत.

कशाकशाने घेतला चावा?


कुत्र्याने चावा घेतलेले १,२८८ :
जिल्ह्यात कुत्र्यांच्या वाढत्या संख्येने लोकांची डोकेदुखी वाढलेली आहे. जिल्ह्यात गेल्या ४ महिन्यांत १२८८ जणांना चावा घेतला. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयांमध्ये वेळीच उपचार करण्यात आले.

सापाने चावा घेतलेले ११५ :
सरपटणाऱ्या प्राण्यांकडून दंश करण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात सरपटणारे प्राणी बाहेर पडतात. त्यामुळे अनेकदा चावा घेऊन लोकांना जखमी करतात. अशातच जिल्ह्यात जानेवारीपासून १५५ जणांना सर्पदंश झालेला आहे.

विंचू, उंदीर चावा घेतलेले १२०० :
जिल्ह्यात श्वानदंश, सर्पदंश यांच्यासह विंचू, मांजर, उंदीर, माकड, कोल्हा व इतर प्राण्यांनी चावा घेतल्याच्या १२०० घटना घडलेल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:33 PM 17/May/2025