चिपळूण : तालुक्यातील खेर्डी, दातेवाडी येथे कौटुंबिक वादातून एका ७४ वर्षीय व्यक्तीला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी रामचंद्र सखाराम खेडेकर आणि राजेश रामचंद्र खेडेकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वसंत भागोजी दाभोळकर यांचा नातू रोहित याने त्यांना फोन करून घरात पत्नी, रामचंद्र खेडेकर, राजेश खेडेकर आणि अलका किलजे यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती दिली. त्यामुळे वसंत दाभोळकर हे घटनास्थळी गेले.
तेव्हा आरोपी राजेश खेडेकर याने वसंत दाभोळकर यांना दोन्ही हातांनी पकडले आणि रामचंद्र खेडेकर याने त्यांच्या पाठीमागून स्टीलच्या पोकळ पाईपने डोक्यात मारून त्यांना जखमी केले. तसेच, आरोपींनी त्यांना शिवीगाळही केली.
याचदरम्यान, फिर्यादी यांचे जावई राकेश यांना आरोपी एल राजेश याने हाताने मारहाण केली आणि फिर्यादी यांच्या मुलीला शिवीगाळ केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेची तक्रार १५ मे २०२५ रोजी पहाटे ०२.१४ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:59 PM 17/May/2025
