साडवली : देवरूख बसस्थानकातील स्वच्छतागृहाचे लाखो रुपयांचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. मात्र अवघ्या महिन्याभरात त्याची दुरवस्था झाली आहे. काही विकृत लोकांनी शौचालयातील नळांची तोडफोड केली आहे. त्यामुळे स्वच्छतागृहात पाणीच नाही. दरवाज्यांचीही तोफफोड केल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्वच्छ भारत मिशन आणि प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेल्या या अद्ययावत स्वच्छतागृहाला काहींच्या चुकीच्या वर्तनाचा फटका बसला आहे.
भर बाजारपेठेत हे स्वच्छतागृह असल्यामुळे फक्त प्रवासीच नव्हे तर अनेक बाहेरचे लोकही त्याचा वापर करतात. प्रवाशांच्या सेवेकरिता शौचालयाचे नूतनीकरण केले होते. काही दिवसांपूर्वी बसविण्यात आलेले नळही गायब झालेले आहेत. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर अशा प्रकारचे अनुचित वर्तन करणारे कोणी निदर्शनास आले, तर त्वरित तक्रार करावी. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. स्वच्छता हीच सेवा मानणाऱ्या सुजाण नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे अशी सूचना केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 19/May/2025













