अॅनिमिया नियंत्रण उपक्रमाचे देवरूखात उद्या उद्घाटन

साडवली : रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर श्रीमद् राजचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (धरमपूर, जि. वलसाड, गुजरात) आणि रत्नागिरीतील स्वयंपूर्तता फाउंडेशन यांच्यावतीने जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सहकार्याने अॅनिमिया नियंत्रण उपक्रम देवरूखमधून सुरू केला जात आहे. त्याचे उद्घाटन २० रोजी सकाळी ११ वाजता देवरुख पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात होणार आहे. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित राहणार आहेत.

वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील व पुढील कालावधीत कोकणातील सर्व स्त्री-पुरुष तसेच शालेय मुले-मुली यांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात येणार आहे. हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी आढळणाऱ्या सर्वांनाच विविध उपाययोजनांच्या माध्यमातून त्यांचे हिमोग्लोबीन प्रमाण योग्य पातळीत आणण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. ग्रामपंचायत, शाळा, हायस्कूल, कॉलेज या ठिकाणी या प्रकल्पाचे प्रत्यक्ष कामकाज होणार आहे. हिमोग्लोबीनचे कमी प्रमाण व त्याचे परिणाम या विषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

देवरुख गटविकास अधिकारी भरत चौगले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद मोरे, स्वयंपूर्तता फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपिका रांबाडे व श्रीमद् राजचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे प्रकल्प संचालक वीरेन गांधी हे उपस्थित राहणार आहेत. या जिल्हास्तरीय अॅनिमिया नियंत्रण प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन स्वयंपूर्तता फाउंडेशनचे सचिव युयुत्सु आर्ते यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 19/May/2025

Happy journey marathi