रत्नागिरी : स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजने अंतर्गत खानू (ता. रत्नागिरी) येथील नूतनीकरण केलेल्या सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन रविवारी झाले. पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्घाटन केले.
ही इमारत चांगली अशीच वर्षानुवर्षे राहण्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी. ती सर्वांची जबाबदारी आहे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सामाजिक बांधिलकी निधीमधून २ कोटी ३० लाख रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आले आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, एसबीआयचे डीजीएम चंद्रशेखर बोहरा, मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र, अरुण जैन, बाबू म्हाप आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, ही अतिशय देखणी इमारत सुसज्ज्य सामग्रीसह महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा खानू येथे होत आहे. मॉड्युलर ऑपरेशन थिएटरसह ही देखणी इमारात उभी राहिली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचे प्राथमिक आरोग्य केंद्र जेव्हा आपण आपल्या गावामध्ये निर्माण करतो, तेव्हा ती वास्तू वर्षानुवर्षे तशीच्या तशी टिकविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. बाजूच्या ग्रामपंचायत इमारतीच्या दुरुस्तीसाठी लागणारा निधीदेखील मंजूर करतो. परंतु चांगल्या दर्जाची इमारत तयार करण्यासाठी सरपंच आणि सदस्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.सैनिकांचे आभार मानत असताना ते म्हणाले, खानूचे रहिवासी अरुण आठल्ये सैन्यामध्ये होते. आपल्या सर्वांसाठी लढत होते. म्हणून त्यांना मानवंदना देणे म्हणजे भारत सरकारच्या सर्व सैनिकांना मानवंदना देणे होय. आरोग्य केंद्रासाठी विनामूल्य जागा देणारे माजी सैनिक अरुण आठल्ये यांचा त्यांनी सत्कार केला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला आशा, अंगणवाडी सेविका, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 19-05-2025













