कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यांमधून वाहतूक सुरू

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यांमधून वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात या महामार्गावरील वाहतूक वेगवान होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम बारा वर्षांपासून जास्त काळ रखडलेले आहे. हे काम २०२५ मध्ये पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. त्या तुलनेत येथील कामाला वेग आलेला नाही. पावसाळ्यात पुन्हा वेग कमी होणार आहे. कशेडी घाट हा महामार्गावरील अतिशय अवघड आणि धोकादायक असा घाट आहे. कोकणात तसेच कोकणमार्गे गोव्यात जाण्यासाठी कशेडी घाटाशिवाय पर्याय नव्हता. मात्र, करोडी घाटात मोठा बोगदा बांधण्यात आल्यामुळे येथील प्रवास सुखकर होत आहे.

कशेडी घाटातील दोन किलोमीटरच्या दोन्ही स्वतंत्र बोगद्यांमध्ये कायम स्वरूपी वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून ११ मेगावॉट विजेची मागणी केली होती. याला परवानगी मिळत नसल्याने तात्पुरती व्यवस्था म्हणून जनरेटवर वीजपुरवठा सुरू केला होता. त्यामुळे अनेकवेळा वीजपुरवठा अडथळे निर्माण होत होते. आता महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन्ही बोगद्यांतील वाहतूक सुरळीत केली आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला.

कशेडी घाटातील ४५ मिनिटांचा प्रवास या बोगद्यामुळे आठ मिनिटांत होत आहे. या महामार्गावरून वाहने सुपरफास्ट वेगाने धावू शकत आहेत.

कातळ फोडण्यासाठी बूमर यंत्र
कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गासाठी एक अत्याधुनिक भुयार खोद कामाचे यंत्र म्हणजेच बूमर वापरले होते. याद्वारे तीन ते चार मीटर लांचीचे कातळ फोडले जात होते. २० मीटर रुंदी आणि ६.५ मीटर उंची अशा पद्धतीने भुयारी मार्गाचे खोदकाम करण्यास बूमर यंत्राचा उपयोग केला आहे.

आपत्कालीन परिस्थितीसाठी व्यवस्था
घाटमार्गे चौपदरीकरण शक्य नसल्यामुळे भारतीय पद्धतीचा भुयारी मार्ग खणून रस्ता तयार केला आहे. घाटात ३.४४ किमी लांबीचा बोगदा बनविण्याचे काम रिलायन्स इन्फास्ट्रक्चर कंपनीने घेतले होते. या बोगद्याचे काम करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी रस्ता बनविण्यात आला. दोन भुयारी बुमर तंत्रज्ञानाच्या साह्याने ७.२ किमी लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का रस्ता तयार केला आहे. या दोन्ही भुयारी मार्गात आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त असलेली वायूविजन सुविधा भुयाराचे वैशिष्ट्य आहे. पोलादपूर बाजूच्या पहिल्या अर्धा किमीच्या टप्प्यात दोन्ही भुयारी मार्गामध्ये जोड भुयारी मार्ग तयार केला आहे. तसेच आतील भागात पुन्हा यू टर्न घेणाऱ्या वाहनांसाठी अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची सुविधा या भुयारी मार्गावर आहे.

दोन्हीं बोगद्यांतील विजेचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे बोगद्यातील प्रवास सुरळीत करण्यात यश आले आहे. तसेच पावसाळ्यापूर्वीची तयारीही आम्ही केली आहे- पंकज गोसावी, अभियंता, सार्वजनिक विभाग

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 19/May/2025