रत्नागिरी : राज्य शासनाच्या आदेशानुसार १ जूनपासून समुद्रातील मासेमारी बंदी सुरू होईल. तत्पूर्वी अखेरच्या टप्प्यात हाती लागतील तेवढा फायदा मिळवून घेण्यासाठी मच्छीमार सरसावले आहेत. दिवसा समुद्रात अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्य विभागाच्या ड्रोनची नजर असते. त्यावर मार्ग काढून रात्री विजेच्या प्रखर प्रकाशाचा (एलईडीचा) वापर करून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात आहे. याला शाश्वत मच्छीमार हक्क संघाच्या पदाधिकाऱ्यांनीही वाचा फोडली आहे.
मात्र, त्याकडे मत्स्य विभागाने दुर्लक्ष केले आहे. रत्नागिरी शहराजवळील मिऱ्या किनाऱ्यावरून समुद्रात एका रांगेत उभ्या असलेल्या नौका पाहायला मिळत आहेत. त्याकडे मत्स्य विभाग लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मॉन्सूनचे आगमन लवकर होत असल्यामुळे या किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी १५ एप्रिल ते १४ जून तसेच पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनचे आगमन उशिरा होत असल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत असतो, शासनाच्या आदेशानुसार या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते.
त्यामुळे परवानाधारक बिगर-यंत्रचालित नौका वगळता अन्य सर्व प्रकारच्या नौकांना मासेमारी करण्यास बंदी असते. बारा दिवसांत मासेमारी बंदी कालावधी सुरू होणार असल्यामुळे सध्या वातावरण पोषक असले तरीही मच्छीमार समुद्रात धाव घेत आहेत. सध्या एलईडी मासेमारीवरून देशभरात विरोधी वातावरण आहे.
केंद्रीय मत्स्य मंत्र्यांनीही काही दिवसांपूर्वी एलईडी मासेमारीविरोधात कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत परराज्यातील मच्छीमारांचा मोठ्या प्रमाणात राबता असतो. त्यांच्या एलईडी नौका येथील किनाऱ्यावर येउन मासेमारी करीत असतात, आता त्यांच्याकडेवर स्थानिक मच्छोमारी नौकाही असल्याचे पुढे येत आहे. गेल्या काही दिवसांत मिऱ्या किनाऱ्यावरून बारा वाांत काही नौका एलईडीचा वापर करून मासेमारी करीत असल्याचे दिसून येत असल्याचे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे.
दिवसभर ड्रोनची गस्त सुरू असल्याने या नौका रात्रीच्यावेळी समुद्रात जात असल्याचे मच्छीमारांचे मत आहे. शेवटच्या टप्प्यात तरी एलईडीवर कारवाई करावी, अशी मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे.
रत्नागिरीच्या किनाऱ्यावर काही मच्छीमार एलईडीचा वापर करून नौकांचाही समावेश आहे. हे जर असेच सुरू राहिले तर फक्त कागदावरच मासा पाहायला मिळेल, अशी अवस्था निर्माण होईल. याकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. दत्तगुरू विनायक कीर, सचिव, शाश्वत मच्छीमार हक्क संघ, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 19/May/2025













