लांजा : लांजा तालुक्यातील बंद असलेली पाचही आधार कार्ड केंद्र तातडीने सुरू करून जनतेची, विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी लांजा तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
शैक्षणिक क्षेत्र, बँका असो किंवा इतर सर्वच शासकीय कामे अशा सर्वच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून लांजा शहरासह तालुक्यातील पाचही आधार कार्ड केंद्र बंद असल्याने विद्यार्थ्यांसह जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे.
गावागावांतून आधार कार्ड केंद्रांवर येणाऱ्या जनतेची मोठी गैरसोय होत आहे. एकतर एसटी किंवा अन्य खासगी वाहनाने गावागावांतून आधार कार्ड काढण्यासाठी केंद्रावर यायचे आणि हे केंद्र बंद असल्यामुळे पुन्हा घरी जायचे. आपला कामधंदा, रोजगार सोडून आधार कार्ड काढण्यासाठी येणाऱ्या लोकांना हे केंद्र बंद असल्याने पुन्हा घरी जावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे लवकरच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनादेखील आधार कार्डची गरज भासणार आहे.
अशी परिस्थिती असताना गेल्या तीन महिन्यांपासून बंद असणाऱ्या तालुक्यातील पाचही आधारकार्ड केंद्रांपैकी लांजा येथील एक आधार कार्ड केंद्र दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले असले तरी तालुक्यातील सापुचेतळे व इतर चार ठिकाणी असलेली आधार कार्ड केंद्र अद्यापही बंद आहेत. नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड अपडेट करणे यांसारखी ग्रामस्थांची कामे प्रलंबित आहेत. त्यामुळेच केवळ एक आधार कार्ड केंद्र सुरू करून लोकांची गैरसोय टळणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 19/May/2025














