पुणे : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातील स्वर्ग’मध्ये लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भातही मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
पण या पुस्तकाच्या नावावरुन बरीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांकडून राऊतांवर टीका होऊ लागली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संजय राऊत यांच्यावर निशाण साधला आहे. नरकात किंवा स्वर्गात एकाच वेळी दोन्ही ठिकाणी जाता येणार नाही, अशी कोपरखळी आठवले यांनी मारली आहे. ‘नरकात स्वर्ग’ निर्माण करणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी स्वर्गात जायचे की नरकात हे आधी ठरवावे असा सल्लाही त्यांनी यावेळी राऊत यांना दिला आहे.
निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढवाव्या
आठवले म्हणाले, प्रदीर्घ काळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत पार पाडाव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. या निवडणुका भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि आरपीआय यांनी महायुती म्हणून एकत्रित लढवाव्या अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
किमान १५ प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी
महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांना भेटून आपण ही भूमिका मांडणार आहोत. या निवडणुकांमध्ये आरपीआयला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी आग्रही आहे. पुणे महापालिका निवडणुकीत किमान १५ प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी, संपूर्ण पाच वर्षांसाठी उपमहापौरपद मिळावे. मागासप्रवर्गाचे आरक्षण आल्यास महापौरपद मिळावे, अशा प्रमुख मागण्या असल्याचे सांगितले. त्यासंबंधी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा झाली असून योग्य प्रतिसाद मिळेल, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.
भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभ परिसराच्या विकासासाठी शंभर ते दीडशे एकर जागा ताब्यात घेऊन जिल्हाधिकारी व सामाजिक न्याय विभागाने प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी निधी मिळवून देण्यासाठी मदत करू, अशी ग्वाही आठवले यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:22 19-05-2025
