Asia Cup : भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार की नाही? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Team India, Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील वाढत्या तणावामुळे आशिया कप २०२५ चर्चेत आहे. आयसीसी स्पर्धेनंतर ही एकमेव स्पर्धा आहे, जिथे भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांसमोर येतात.

परंतु काही वृत्तांच्या दाव्यानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया कप २०२५ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) देखील आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. पण आता या बातमीवर बीसीसीआयकडून एक मोठी अपडेट आली आहे.

Asia Cup 2025 बद्दल BCCI चे मोठे विधान

बीसीसीआयने आशिया कप २०२५ बाबतच्या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी पीटीआयला सांगितले, “सध्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आज सकाळपासून आम्ही ACCच्या स्पर्धा असलेल्या आशिया कप आणि वूमेन्स इमर्जिंग उदयोन्मुख आशिया कपमध्ये भारत भाग घेणार नाही, अशा बातम्या पाहतोय. पण अशा बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. हे सारं कपोलकल्पित आहे. कारण आतापर्यंत बीसीसीआयने एसीसीच्या आगामी कार्यक्रमांबद्दल चर्चाच केलेली नाही किंवा असे कोणतेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे एसीसीला पत्र लिहिण्याचा प्रश्नच येत आहे.”

Asia Cup बद्दलच्या सगळ्या बातम्या काल्पनिक

सचिव देवजीत पुढे म्हणाले, “सध्या आमचे मुख्य लक्ष IPL आणि नंतर इंग्लंड मालिकेवर आहे, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघांचा समावेश आहे. आशिया कप किंवा इतर कोणत्याही एसीसी स्पर्धेचा मुद्दा कोणत्याही स्तरावर चर्चेसाठी आलेला नाही. त्यामुळे त्यावरील कोणतेही वृत्त किंवा अहवाल पूर्णपणे काल्पनिक आहेत. जेव्हा जेव्हा बीसीसीआय एसीसीच्या कोणत्याही कार्यक्रमावर चर्चा करेल आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल तेव्हा तो माध्यमांद्वारे जाहीर केला जाईल.”

आशिया कप सप्टेंबरमध्ये

आशिया कप २०२५ सप्टेंबरमध्ये खेळला जाईल. यावेळी स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. गेल्या वेळी ही स्पर्धा पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवण्यात आली होती. त्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानचा दौरा केला नाही आणि त्यांचे सर्व सामने दुबईत खेळले. या स्पर्धेचा अंतिम सामनाही दुबईत झाला, ज्यामध्ये टीम इंडिया जिंकली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:23 19-05-2025