रत्नागिरी : महावितरणच्या विविध सेवांचा लाभ व तक्रारी नोंदविण्यासाठी महावितरणने ‘ऊर्जा’ चॅटबॉट विकसित केले आहे. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व अन्य ग्राहकांसाठी ही सेवा महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाइल अॅपवर 24 तास उपलब्ध असणार आहे. इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅटबॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना यावरून प्रश्न विचारता येणार आहेत.
नवीन वीजजोडणी, वीजबिल भरणा, तक्रार निवारण याबाबत माहिती घेता येणार आहे. महावितरणच्या वीज सेवेबाबत माहिती कुठे विचारावी व सेवांचा घरबसल्या लाभ कसा घ्यावा, हा प्रश्न यामुळे संपुष्टात आला आहे. ज्या वीज सेवेबद्दल माहिती हवी आहे ती ‘ऊर्जा’च्या माध्यमातून ग्राहकांना थेट ऑनलाइन मिळणार आहे. तसेच मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना मोबाइल क्रमांक किंवा ग्राहक क्रमांक सबमिट करून विविध सेवा घेण्यासाठी चॅटबॉटद्वारे महावितरणसोबत संवाद साधता येणार आहे.
नवीन वीज जोडणी, त्यासाठी केलेल्या अर्जाची स्थिती, वीजबिल तपशील, जलद वीजबिल भरणा, स्वतः मीटर वाचन, गो-ग्रीन नोंदणी याबाबत चॅटबॉटद्वारे मदत केली जाणार आहे. वीज पुरवठा खंडित होणे, अन्य तक्रारी थेट ऑनलाइन नोंदवता होणार आहे. तसेच टोल फ्री क्रमांक, एसएमएस, ई-मेल, मिस्ड कॉल यांचीही माहिती चॅटबॉटद्वारे उपलब्ध होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:49 18-09-2024