रत्नागिरीत १४ वर्षीय मुलीचे अपहरण : शहरात खळबळ

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील धनजीनाका परिसरातील एका नॉव्हेल्टी दुकानातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना काल, ०८ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने रत्नागिरी शहरात खळबळ उडाली असून, अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरुगवाडा येथील रहिवासी असलेले अलीसाहेब हसनमियों मुकादम (वय ४०, व्यवसाय मच्छीमारी) यांची मुलगी अजबा अलीसाहेब मुकादम (जन्मदिनांक २५/०८/२०१०, वय १४ वर्षे ९ महिने १४ दिवस) ही दररोजप्रमाणे ०८ जून रोजी सकाळी ९ वाजता धनजीनाका येथील एका नॉव्हेल्टी दुकानात कामावर गेली होती. नेहमीप्रमाणे ती दुपारी ३ वाजेपर्यंत घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबियांना काळजी वाटू लागली.

वडिल अलीसाहेब मुकादम यांनी तात्काळ अजबाच्या मालकाशी, अनसार मेमन यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अजबा दुपारी २ वाजता दुकानातून निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी मांडवी, भाट्ये, एस.टी. स्टँड परिसरात तिचा शोध घेतला. तसेच नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र अजबाचा कोणताही थांगपत्ता लागला नाही.

यामुळे, अलीसाहेब मुकादम यांना खात्री झाली की, त्यांच्या मुलीच्या अल्पवयीनपणाचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी, त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रात्री ११.३९ वाजता तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अल्पवयीन मुलीचे दिवसाढवळ्या शहरातून अपहरण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अपहृत अजबा अलीसाहेब मुकादम हिचा युद्धपातळीवर शोध घेत असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 09-06-2025