Global Tennis Cricket League News : टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेत एका भव्य अशा स्पर्धेची मुंबईत घोषणा करण्यात आली. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर पियुष चावलाच्या (Piyush Chawla) उपस्थितीत ग्लोबल टेनिस क्रिकेट लीग (GTCL60) ची घोषणा झाली.
60 बॉल (सिक्टी बॉल) फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार असून, यामध्ये जगभरातील 8 आंतरराष्ट्रीय संघ सहभाग घेणार आहेत. ही स्पर्धा यूएईतल्या शारजाह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडणार आहे.
स्पर्धेचं लॉन्चिंग, दिग्गजांची उपस्थिती
स्पर्धेच्या या भव्य लॉन्च इव्हेंटला भारतीय क्रिकेटर पियुष चावला, बॉलिवूड अभिनेता सोहेल खान (Sohail Khan), अभिनेता विंदू दारा सिंग (Vindu Dara Singh), संगीतकार साजिद आणि क्रिकेटपटू इक्बाल अब्दुल्ला (Cricketer Iqbal Abdullah) यांच्यासह अनेक प्रसिद्ध चेहरे उपस्थित होते.
GTCL60 लीग जगभरातील टॉप टेनिस बॉल क्रिकेटपटूंना एकाच व्यासपीठावर आणणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा ठरणार आहे. 10 षटकांच्या (60 बॉल) सामन्यांच्या स्वरूपामुळे प्रत्येक सामना पहिल्या चेंडूपासूनच अॅक्शनने भरलेला असेल.
आयोजक म्हणतात…
GTCL60 चे आयोजक अमीन पठाण यांनी स्पर्धेबाबत म्हटलंय… ‘आज आपण अशा लीगची घोषणा करत आहोत की जी प्रत्येक खेळाडूच्या हृदयाशी जोडलेली आहे. आम्ही भारतात आणि परदेशात 30 शहरांमध्ये ट्रायल्स घेणार आहोत. जेणेकरून प्रत्येक गुणवान खेळाडूला संधी मिळेल. ही केवळ लीग नसून एक चळवळ आहे जी टेनिस बॉल क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून टाकेल.’
टेनिस बॉल क्रिकेट ते टीम इंडिया
यावेळी भारताचा माजी क्रिकेटर पियुष चावलानंही टेनिस क्रिकेटबाबतचा आपला अनुभव शेअर केला.
‘प्रत्येक क्रिकेटपटूची सुरुवात टेनिस बॉल क्रिकेटनेच होते, माझीही झाली होती. ही लीग तरुण आणि गल्ली क्रिकेट खेळणाऱ्यांना मोठ्या व्यासपीठावर आणण्याचं काम करेल. GTCL60 ही खर्या अर्थाने गेम-चेंजर ठरू शकते.’
कशी असेल रजिस्ट्रेशन प्रक्रिया?
या लीगसाठी लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. सुरुवातीला ओपन रजिस्ट्रेशन होईल. त्यानंतर भारतात आणि परदेशात 30 शहरांमध्ये निवड चाचण्या (ट्रायल्स) घेतल्या जातील. त्यातून निवडलेले खेळाडू पुढे ड्राफ्ट प्रक्रियेत सहभागी होतील, जिथे फ्रँचायझी संघ त्यांचे अंतिम संघ निवडतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:57 18-06-2025
