लांजा, राजापूर विकासासाठी संघटनेतर्फे निधी देणार : संजय राऊत यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

लांजा : रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील शिवसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारावर निष्ठा असलेले शिवसैनिक आहेत. खचून जाऊ नका, जिल्ह्यात पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, विकासकामासाठी निधी संघटनेच्या माध्यमातून दिला जाईल, असे आश्वासन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लांजा व राजापूर तालुक्यातील शिष्टमंडळाला दिले.

लांजा व राजापूर तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेत लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदार संघाला विकास निधी मिळण्याबाबत निवेदन दिले. यावेळी या विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी व विकास कामासाठी आवश्यक तेवढा निधी देण्याचे आश्वासन संजय राऊत यांनी शिष्टमंडळाला दिले.

रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कदम, माजी जिल्हा संपर्क तथा रत्नागिरी जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग उपळकर यांनी मतदार संघातील विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करून लवकरच निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली. तालूका संपर्क प्रमुख अनिल भोवड, विधानसभा क्षेत्र संघटक रामचंद्र (तात्या) सरवणकर यांनी संजय राऊत यांना राजापूरला भेट देण्यासाठी आग्रह केला असता राऊत यांनी लवकरच तारीख निश्चित करून कळवतो असल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, ओबीसी अध्यक्ष पांडुरंग उपळकर, विधानसभा संघटक रामचंद्र (तात्या) सरवणकर, राजापूर तालूका संपर्क प्रमुख अनिल भोवड, राजापूर तालूका प्रमुख मुंबई बबन सकपाळ, सहसंपर्क प्रमुख नामदेव नार्वेकर, पाचल विभाग प्रमुख विलास नारकर उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी स्वतः हुन विकास कामासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासीत केल्याबद्दल सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांतर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 24/Jun/2025