पाचल : पहिल्याच पावसात पाचल जवळेथर रस्त्या दरम्यानच्या मुर सुतारवाडी ते तळवडे ताम्हाणे फाटा या सात कि.मी. लांबीच्या रस्त्याची दुर्दशा झाली असून, रस्ता वाहतुकीला धोकादायक बनला आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी सातत्याने संपर्क साधूनही कोणतीही उपाययोजना झालेली नाही. रस्त्याच्या दुरूस्तीसंदर्भात आमदार किरण सामंत यांनाही पासाळ्यापूर्वीच निवेदन दिले होते. मात्र याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याने रस्त्याची अवस्था एकदम बिकट झाली आहे. या रस्त्याच्या देखभालीकडे झालेले दुर्लक्ष, सतत पडणारा मुसळधार पाऊस आदी कारणांनी रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील मोऱ्यांची अवस्था देखील बिकट झाली आहे.
रस्त्याच्या साईडपट्ट्या गायब झाल्या आहेत. या रस्त्यावरून वाहतूक करणारे वाहानचालक व नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. उद्या मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल जनतेमधून विचारला जात आहे.
सिंधुदुर्ग व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा एक महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याचा वापर सुमारे १५ ते २० गावातील ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी व कर्मचारी करीत असतात. या रस्त्यावर एसटी आणि वाहनांची मोठ्याप्रमाणावर वर्दळ सुरू असते. रायपाटण ग्रामीण रूग्णालय, खापणे महाविदयालय, अनेक शैक्षणिक संस्था व पाचल बाजारपेठ यामुळे या रस्त्यावर वाहनांची तसेच पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामानाने सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरूस्तीकडे लक्ष दिलेले नाही. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 24/Jun/2025














