मोहरम महिन्यास २७ जूनपासून प्रारंभ

रत्नागिरी : मुस्लिम समाजाच्या मोहरम महिन्याची सुरुवात शुक्रवार, दि. २७ जून रोजी होणार आहे. दि. २६ जून रोजी मोहरमचे चंद्रदर्शन होईल. त्यानंतर इस्लामच्या नवीन वर्षास प्रारंभ होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी पंजाची स्थापना करण्यात येते. त्यानंतर ५ व ६ जुलै रोजी छोटे पीर, बडे पीर अशा मानाच्या दोन्ही पंजाची, ताबूतची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम, हजरत हुसेन यांच्यासह ७२ कुटुंबाच्या हौतात्म्याच्या पवित्र स्मृती (कुर्बानी) जागवणाऱ्या व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून जातीय सलोखा बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी भारतात सुफी संतांच्या प्रेरणेने यादे हुसेन मोहरम सण अनेक वर्षापासून साजरा होतो. यंदा दि. २७ जूनपासून इस्लामी नूतन वर्षाची सुरुवात होणार आहे. मोहरमची १ हिजरी सन १४४७ दिवशी सण साजरा केला जातो. मोहरम हा इस्लामिक वर्षातील पहिला महिना आहे आणि याला खूप महत्त्व आहे.

हा महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात युध्द करणे निषिध्द आहे. शिया मुस्लिामांसाठी मोहरमचा दहावा दिवस, ज्याला आशुरा म्हणतात, हा विशेषतः महत्त्वाचा असतो. जिल्ह्यात मोहरम सणाची तयारी सुरू झाली आहे.

लांजा शहरात मिरवणुका
मोहरम सणानिमित्त लांजा शहरात मोठ्या उत्साहात मानाच्या दोन्ही पंजाची मिरवणुका काढण्यात येणार आहे. ५ जुलै रोजी रात्री ९ ते १२ तर ६ जुलै रोजी दुपारी ३ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मानाच्या दोन्ही पंजाची मिरवणुका काढण्यात येणार आहे.

ठिकठिकाणी शरबत, खाऊ वाटप मोहरम सणानिमित्त
कोकणातील रत्नागिरीसह इतर तालुक्यात विविध संघटना, संस्था, मुस्लिम बांधवांच्या वतीने महाप्रसाव वाटप करण्यात येते. त्याचबरोबर शरबत, खाऊ वाटप करणार आहेत.. काही ठिकाणी जेवणाची सोय ही करण्यात येणार आहे. मुस्लिम बांधव चोंगे (गोडपदार्थ) बनवून घरात खातात व गोरगरिबांना वाटप करत असतात.

कोकणात याठिकाणी मोहरमच्या मिरवणुका
रत्नागिरी शहरातील धनजीनाका, कोकण नगर, राजिवडा भागात यासह लांजा, राजापूर, खेड, दापोली, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, मंडणगड या तालुक्यातही मोहरम साजरा करतात. ५ ते ६ जुलै दरम्यान मानाचे छोटे, मोठे पंजाची मिरवणुका शहरात काढण्यात येणार आहे त्याची तयारी सुरू झाली आहे. ठिकठिकाणी सवारीवर गुलाब पुष्पासह खारीक, बदाम, खोबरे, खडीसाखरेची उधळण करण्यात येत असते.

हा महिना आषाढी, मोहरम सण एकाच दिवशी
आषाढी एकादशी येत्या ६ जुलै रोजी आहे. यादिवशी देशभरातील कानाकोपऱ्यातून वारकरी, भाविक लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात जमतात. त्याच दिवशी मुस्लिम बांधवांचा मोहरम सण आहे. दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे दोन्ही धर्माचे बांधव आतुरतेने यादिवसाची वाट पाहत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 25/Jun/2025