रत्नागिरी जिल्हा परिषद आवारात पार्किंगचा बोजवारा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद आवारात सध्या वाहन पार्किंगचा पुरता गोंधळ उडाला असून, जिल्हाभरातून कामानिमित्त येणारे नागरिक आणि कर्मचारीवर्ग प्रचंड मनस्ताप सहन करत आहेत. जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने अधिकृत पार्किंगच्या जागेवरच मातीचे भलेमोठे ढिगारे टाकल्याने, वाहने रस्त्यावरच पार्क करण्याची वेळ आली आहे. या मनमानी कारभारामुळे वाहतूक कोंडीची समस्याही गंभीर बनली आहे.

जिल्हा परिषद भवनात दररोज कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांची मोठी गर्दी असते. नूतन इमारतीच्या कामामुळे मूळ पार्किंगची जागा उपलब्ध नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जेल प्रशासनाची मोकळी जागा पार्किंगसाठी मिळवली होती. तेव्हापासून या जागेचा वापर वाहनतळ म्हणून केला जात असल्यामुळे सर्वांची सोय झाली होती.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून बांधकाम ठेकेदाराने याच जागेवर माती आणून टाकल्याने पार्किंगची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पार्किंगसाठी जागाच शिल्लक नसल्याने नागरिकांना आपली वाहने नाइलाजास्तव मुख्य रस्त्याच्या कडेला उभी करावी लागत आहेत.

यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अनेकांना आपली वाहने दूर माळनाका परिसरात पार्क करून पायपीट करत जिल्हा परिषद गाठावी लागत आहे. ठेकेदाराच्या या मनमानी कारभारावर जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने कारवाई करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Kore Mobile

दररोज वादाचे प्रसंग…
ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे वाहन पार्किंग व्यवस्था बंद आहे. यामुळे अनेक वाहन चालक हे जिल्हा परिषद भवनाच्या आतमध्ये वाहन पार्किंग करत आहेत. यावेळी अधिकाऱ्यांच्या वाहनांना अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे दररोज वाहनचालक व जिल्हा परिषद सुरक्षा कर्मचारी यांच्यात दररोज वाद होत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 25/Jun/2025