रत्नागिरी : दिव्यांग प्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी

रत्नागिरी : शिक्षण विभागात दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्या शिक्षक व कर्मचार्‍यांची फेरवैद्यकीय तपासणी करून, खोटे प्रमाणपत्र सादर करणार्‍या उमेदवारांवर कारवाई करावी, असे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. बदली प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आल्याने शिक्षक वर्गात पुन्हा खळबळ उडाली आहे. शिक्षण आयुक्तांनी राज्यातील जिल्हा परिषद तसेच सर्व माध्यमांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी परिपत्रक जारी करून सूचना केल्या आहेत.

राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय सेवेत प्रवेश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे खर्‍या दिव्यांगांना अन्याय सहन करावा लागत आहे. गतवर्षी सामान्य प्रशासन विभागाने सर्व कर्मचार्‍यांची प्रमाणपत्र पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रक्रियेत शिक्षण विभागातील सर्वाधिक प्रमाणपत्रांची तपासणी झाली. मात्र, काही शिक्षकांनी अद्यापही आपली प्रमाणपत्रे पडताळणीसाठी सादर केली नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय सेवेत नियुक्ती मिळविल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या विषयाच्या अनुषंगाने, तसेच सार्व. आरोग्य विभागाच्या 14 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासन निर्णयातील निर्देश व तरतुदीनुसार कार्यालयामध्ये, विभागामध्ये दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे नियुक्त झालेल्या, तसेच पदोन्नती मिळालेल्या अधिकार्‍यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची खातरजमा करून अहवाल आयुक्त कार्यालयास सादर करावा, असे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

कारवाईची मागणी
शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण राज्यभर गाजले होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत सक्त आदेश देऊन दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी ठराविक मुदत घालून द्यावी, अशी मागणी होत आहे. यातून बोगस कर्मचारी उघड होणार असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:25 25-06-2025

Tata motars tiago