स्वायत्त कोकणासाठीचे आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरूच

रत्नागिरी : महाराष्ट्राला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या कोकणाला विकासाचा सर्वाधिक निधी मिळाला पाहिजे आणि स्वायत्त कोकणच्या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरू राहील, असे संजय यादवराव यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू असलेल्या या आंदोलनात सुमारे ५०० शेतकरी, आंबा बागायतदार, पर्यटन व्यवसायिकांनी सहभाग घेतला होता. माकडांवरील नियंत्रण, आंबा बागायतदार व मच्छीमार कर्जमाफी, राज्याला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या कोकण प्रदेशाला सर्वाधिक विकासाचा निधी मिळाला पाहिजे व तो योग्य ठिकाणी खर्च झाला पाहिजे यासाठी स्वायत्त कोकण समितीची स्थापना आणि दबाव गट, कोकणातल्या तरुणांना कोकणातच नोकरी मिळावी याकरिता पुन्हा प्रादेशिक निवड मंडळ स्थापना, कोकण विकास प्राधिकरण प्रत्यक्ष सुरू होणे, हापूस आंबा विम्याचे पैसे तत्काळ मिळणे आणि विम्याचे निकष कोकणासाठी स्वतंत्रपणे बनवणे, विशेषतः पर्यटन आणि कोकणात व्यवसाय करण्यासाठी एक महिन्यात परवानगी मिळणे, अशा प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असे यादवराव यांनी सांगितले.

स्वायत्त कोकण समिती स्थापन
प्रत्येक जिल्ह्यात पर्यटन, शेती बागायती, मत्स्योद्योग आणि जलसंवर्धन अशा कोकण विकासाच्या मुलभूत विषयावर काम करण्यासाठी उद्योजक आणि तज्ज्ञ यांची प्रत्येक जिल्ह्यात २५ जणं अशी पाच जिल्ह्यात १२५ सदस्यांची स्वायत्त कोकण समिती स्थापन केली आहे. ही समिती संजय यादवराव यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे, असे समृद्ध कोकण संघटना सरचिटणीस संदीप शिरधनकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 21-09-2024