पाली : श्री लक्ष्मी पल्लीनाथ मंदिरात श्रावणोत्सव

रत्नागिरी : पाली-पाथरटचे ग्रामदैवत व अनेक कुळांचे कुलदैवत असणाऱ्या पालीच्या मुख्य श्री लक्ष्मी पल्लीनाथ मंदिरात श्रावण मासानिमित्त (ता. २७) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पवित्र महिन्यातील धार्मिक सोहळ्यांसाठी मुख्य मंदिरात महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, गोवा, गुजरात यांसह परदेशातून येऊन भाविक आध्यात्मिक सेवा, भक्ती करतात. त्यामुळे या सोहळ्याचे विशेष आकर्षण असते. पालीचे हे मंदिर दक्षिणाभिमुख असून, देवाचा वार रविवार आहे. यामुळे पालीच्या मुख्य मंदिरात सकाळी ८ वाजता वैयक्तिक अभिषेक, एकादष्णी, लघुरूद्र, पवमान असे धार्मिक कार्यक्रम होतील. यासाठी देवस्थानामार्फत पौरोहित्यासाठी गुरुजींची व्यवस्था आहे. त्यानंतर दुपारी १२.३० ते १ वाजेपर्यंत नैवेद्य, दुपारी १ ते १.३० वाजेपर्यंत आरती, महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम होतील. ३ ऑगस्ट रोजी याप्रमाणेच सर्व नियोजित धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

१० ऑगस्टला सकाळी ६ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सोमवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत अखंड हरिनाम गजर केला जाईल. हातात वीणा घेऊन अभंग, भजन, कीर्तन, आरती होईल. १७ ऑगस्टला श्रींच्या मंदिरात ४० पौरोहित्य करणाऱ्या गुरुर्जीच्या उपस्थितीत महारूद्र, नैवेद्य, आरती, महाप्रसाद होऊन श्रावण मासातील सर्व कार्यक्रमांची सांगता होईल.

पालीचे मुख्य श्री लक्ष्मी पल्ल्लीनाथ देवस्थान हे कऱ्हाडे ब्राह्मण, मराठा, सोनार, कुणबी, कुंभार यांच्यातील काही कुळांचे कुलदैवत व पाली पाथरटासहित तीन गावांचे ग्रामदैवत आहे. या श्रावण मासातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य मानकरी संतोष सावंतदेसाई यांनी केले आहे.

रक्षासुताचा अविस्मरणीय सोहळा
७ ऑगस्ट रोजी श्रावण शुद्ध त्रयोदशी असून, या दिवशी सायंकाळी ४ वाजता मंदिरात ३६० फेरे असलेला रक्षासुत श्री लक्ष्मीपल्लीनाथ व श्री महालक्ष्मी यांच्या गळ्यात घालण्याचा कार्यक्रम होईल. चंद्रवर्षानुसार ३६० दिवस सर्व भक्तांचे रक्षण व्हावे म्हणून हे रक्षासुत देवाच्या गाभाऱ्यापासून ते प्रत्येकाच्या हातात देत रांगेत देवाच्या तळीपर्यंत नेण्यात येईल. तेथे घाट धुपारती होऊन भाविक ते तोडून आपल्या हातात बांधतील. त्यानंतर पुजारी, मानकरी व ग्रामस्थांना गळ्यात घालण्यासाठी व घरी नेण्यासाठी पोवते वाटप होईल. हेच पोवते भाद्रपदात गणेश चतुर्थीला गणेशाच्या प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीच्याही गळ्यात घालण्याची प्रथा परंपरा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 28/Jul/2025