राज्याला पुढे नेणे, कोकणचा विकास करणे हेच ध्येय : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी : राज्याला पुढे नेणे, कोकणचा विकास करणे हेच आमच्या सरकारचे ध्येय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी केले.

खेड येथील मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकृत इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

ते म्हणाले, राज्यातील एकही माणूस उपाशी झोपता कामा नये. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. राज्यातील एकही माणूस उपचाराविना, औषधाविना मरता कामा नये. राज्यातील शेतकरी आत्महत्या करता कामा नये. राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. हा आपला अजेंडा आहे. सिंधुरत्न योजना सुरू करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू. खेड येथील नाट्यगृहाला दिलेले माँसाहेबांचे नाव हे त्यांना श्रद्धांजली आहे.

यावेळी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, गृहराज्य मंत्री योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार संजय कदम, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आदी उपस्थित होते.

Shree clinic

श्री. शिंदे यांनी सुरुवातीला माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, नाट्यगृहात येताना बाहेरचे आणि नाट्यगृहाच्या आतील काम पाहिल्यानंतर ते खऱ्या अर्थाने उत्तम प्रकारचे झाल्याची खात्री देणारे आहे. नाट्यगृहात आतमध्ये आल्यानंतर शहरातील नाट्यगृहात आल्यासारखे वाटते. रामदासभाईंचा वाढदिवस आणि नाट्यगृहाचे उद्घाटन हा दुग्धशर्करा योग आहे. वाढदिवसानिमित्त रामदास भाईंच्या माध्यमातून जनतेला दिलेले हे गिफ्ट आहे, असे बोललो तर वावगे ठरणार नाही. या नाट्यगृहाला दिलेले माँसाहेबांचे नाव हे त्यांना श्रद्धांजली आहे. रामदासभाई यांच्या संकल्पनेतून आज येथे उभे राहिलेले नाट्यगृह मुंबईसारख्या शहरातील नाट्यगृहालाही लाजवेल असे आहे. याबद्दल राज्यमंत्री योगेश कदम यांचे मनापासून अभिनंदन करतो. आपण ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकरण असे काम करत असतो.

आपल्याकडे नो रिझन ऑन दि स्पॉट डिसीजन असे काम केले जाते. त्यामुळे विकासाच्या प्रकल्पांबाबत आपण तत्काळ सही करून मोकळा होतो आणि त्याचा तात्काळ निधी वर्ग होतो. अडीच वर्षे जे काम केले ते आपल्यासमोर आहे. त्यामुळे अशी नाट्यगृहे उभी राहिली. रस्ते, पाणी अनेक सुविधा आपण देतो. याबरोबरच माणसाच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा म्हणून मनोरंजन व्हायला हवे, त्यामुळे यामध्ये नाट्यगृहांचे खूप महत्त्व आहे. दापोलीत नाट्यगृहासाठी १५ कोटीचा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

राज्यातील एकही माणूस उपाशी झोपता कामा नये, एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, राज्यातील एकही माणूस उपचाराविना, औषधाविना मरता कामा नये. राज्यातील शेतकरी आत्महत्या करता कामा नये, राज्यातील तरुणाला हाताला काम मिळाले पाहिजे, हा आपला अजेंडा आहे. अडीच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून साडेचारशे कोटी रुपये लोकांचे जीव वाचविण्यासाठी आपण दिले. आपण महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पर्यटनाला चालना देण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी सरकार काम करत आहे. मुंबई सिंधुदुर्ग एक्सेस कंट्रोल रोड, मुंबई गोवा सागरी महामार्गबाबत काम सुरू आहे, कोकणातील ९ खाड्यांवर पूल बाधण्याबाबतचे काम प्रगतीपथावर आहे.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, जिल्ह्यात तीन नाट्यगृहे आहेत, या तिन्ही नाट्यगृहांना श्री. शिंदे यांच्या पुढाकाराने निधी मिळाला. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहासाठी १५ कोटी, चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासाठी १५ कोटी रुपये आणि या नाट्यगृहासाठी देखील १३ कोटी मिळाले आणि खऱ्या अर्थाने या जिल्ह्यात सांस्कृतिक चळवळ टिकली पाहिजे, राज्यमंत्री श्री. कदम यांच्या मागणीनुसार या नाट्यगृहाच्या सोलर पॅनेलसाठी ८० लाखांचा निधी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री श्री. गोगावले यांनी वाढदिवसानिमित्त रामदास कदम यांना शुभेच्छा दिल्या व अद्ययावत उभे राहिलेल्या नाट्यगृहाबाबत राज्यमंत्री श्री. कदम यांचे कौतुक केले. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

राज्यमंत्री श्री. कदम यांनी १५ वर्षांपासून बंद नाट्यगृहाच्या कामासाठी १३ कोटीचा निधी दिल्याबद्दल श्री. शिंदे यांचे आभार मानले. येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून ४८ कोटीची नळपाणी योजना मंजूर झाल्याची व त्याचे काम सुरू झाल्याची माहिती दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 28-07-2025