चिपळूण : रोजगार हमी योजनेंतर्गत पेढांबेत १३०८ बांबू रोपांची लागवड

चिपळूण : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पेढांबे येथील तरुण शेतकरी प्रथमेश शिंदे व विशाल शिंदे यांनी आपल्या १.०७हेक्टर जमिनीवर टुल्डा जातीच्या १३०८ बांबूरोपांची लागवड केली आहे. उपक्रमाचा प्रारंभ मंडल कृषी अधिकारी मनोज गांधी यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला उपकृषी अधिकारी संतोष भोसले, साहाय्यक कृषी अधिकारी अश्विनी कणसे, ग्रामविकास अधिकारी अनिता पाटील आणि शेतकरी उपस्थित होते.

या वेळी गांधी म्हणाले, बांबूला हरित सोने असेही म्हटले जाते. बांबू लागवड ही शेतीच्या उत्पन्नाबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी अत्यावश्यक आहे. कमी खर्च, कमी पाणी आणि चांगले दीर्घकालीन उत्पन्न देणारा हा पर्याय प्रत्येक शेतकऱ्याने स्वीकारावा. बांबू लागवडीतून फर्निचर, बांधकाम साहित्य, हस्तकला वस्तू आणि जैविक वस्तूंना कच्चा माल मिळतो. भविष्यात यावर आधारित प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागात निर्माण होऊ शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 31/Jul/2025