प्रेयसी बोलत नसल्याने नैराश्येतून तरुणाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

संगमेश्वर, रत्नागिरी, ३१ जुलै: संगमेश्वर तालुक्यातील कुंडी धावडेवाडी येथे एका तरुणाने प्रेयसी बोलत नसल्याच्या नैराश्यातून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोहम राजाराम पवार (वय अंदाजे २४-२६) असे या तरुणाचे नाव असून, त्याच्यावर सध्या रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहमची प्रेयसी गेल्या चार-पाच दिवसांपासून त्याच्याशी बोलत नव्हती. या गोष्टीचे त्याला प्रचंड नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्याने काल, बुधवारी (३० जुलै) विषारी द्रव प्राशन केले. विष प्राशन केल्यानंतर सोहमला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तातडीने देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची नोंद देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यातून तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Hotel waiter