देवरुख परिसरातील दुर्दैवी घटना; वनविभागाच्या पथकाकडून आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृत गव्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट
देवरुख: Bison Death in Well Sangameshwar ची एक दुर्दैवी घटना संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे येथे समोर आली आहे, जिथे एक मोठा गवा विहिरीत पडून मृत्यूमुखी पडला आहे. रविवारी हा गवा विहिरीत पडल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाला याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि ग्रामस्थांच्या मदतीने गव्याला विहिरीबाहेर काढण्यात आले; परंतु तोपर्यंत उशीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली मृत गव्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. या परिसरात गव्यांचा सतत वावर असतो. मात्र, अनेक विहिरींना कठडे नसल्यामुळे वन्यप्राणी विहिरीत पडण्याच्या दुर्घटना वारंवार घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी सर्व विहिरींना तातडीने संरक्षण भित किंवा कठडे बांधण्यात यावेत, अशी तीव्र मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. सदर कारवाई प्रसंगी परिमंडळ वनाधिकारी संगमेश्वर-देवरुख सागर गोसावी, दाभोळेच्या वनरक्षक सुप्रिया काळे, आरवलीचे वनरक्षक सुरज तेली, फुणगुसचे वनरक्षक आकाश कडूकर, साखरपाचे वनरक्षक सहयोग कराडे, चोरवणेचे पोलीस पाटील अमित कांबळे, तसेच शिवसेना तालुका प्रमुख प्रसाद अपंडकर उपस्थित होते. त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संपूर्ण कारवाई विभागीय वनाधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरीजा देसाई, सहायक वनसंरक्षक रत्नागिरी-चिपळूण प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास नागरिकांनी वन विभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ९०९६४७७७६१ वर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.














