रत्नागिरी : अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री हे धोरण जर भाजपने राबवलं असतं आणि माझा सल्ला ऐकला असता तर आज ही वेळ आली नसती. उद्धव ठाकरे हे महायुतीत असायला पाहिजे होते, असे सांगून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. ते रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले हे शुक्रवारी रत्नागिरी दौर्यावर आले होते. येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेऊन त्यांनी त्याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी शासनाच्या योजनांची माहितीदेखील दिली.
महायुतीतील आजच्या परिस्थितीवर भाष्य करताना ना. आठवले म्हणाले की, अडीच-अडीच वर्षांचा जो प्रस्ताव दिला होता तो भाजपने स्विकारायला हवा होता. मी स्वत: फडणवीसांना सांगितलं होतं की तुम्ही ३ वर्ष मुख्यमंत्रीपद घ्यावं व २ वर्ष शिवसेनेला म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडे द्या, माझं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती, असा खोचक टोला आठवलेंनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, लोकसभेला अपयश आले. ४०-४२ जागा महायुतीला मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र विरोधकांनी मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या. संविधान बदललं जाणार अशी भिती निर्माण केली. मात्र यावेळच्या विधानसभा निवडणुकीत या पराभवाचा वचपा महायुती भरून काढेल.
आरक्षण हे संविधानाने दिलेले आहे. आज मराठा समाजदेखील आरक्षणासाठी लढा देतोय. त्यांची मागणी रास्त आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्यात महायुती सरकारने घेतला आहे. स्वतंत्र आरक्षण ही त्यांची मागणी रास्त आहे. राज्य सरकार त्याबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना ना. आठवले पुढे म्हणाले की, महायुतीत नवे मित्र सहभागी झाले. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. आम्हाला संधी दिली जात नाही. आम्ही फार मोठ्या अपेक्षेत होतो. मात्र अचानक राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यामुळेच आमच्या अडचणी वाढल्या, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हा स्वतंत्र पक्ष आहे. महायुतीला या पक्षाची फार मोठी ताकद मिळाली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत आम्हाला भाजपच्या कोट्यात न टाकता, आमचा स्वतंत्र विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
विधानसभेचे पडघम वाजू लागलेले असताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआय सज्ज आहे, असे सांगून त्यांनी या निवडणुकीत आरपीआयकडून १८ जागांचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती दिली. त्यातील १० ते १२ जागा या मिळाल्याच पाहिजेत, असा आग्रहदेखील धरला असल्याचे ना. आठवले यांनी सांगितले.
एकूण १८ जागांचा प्रस्ताव दिलेला असताना किमान १० ते १२ जागा पदरात पडतील, अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले की, उमरखेड, धारावी, मालाड, चेंबूर, कल्याण-पश्चिम, अंबरनाथ, संभाजीनगर पश्चिम, वाशिम आदी प्रमुख जागांची मागणी त्यांनी केली.
राज ठाकरेंना महायुतीत घेऊ नका, हे मी सुरुवातीपासून सांगत होतो. त्यांचा फारसा फायदा झाला नाही. राज ठाकरेंमुळे उत्तर भारतीय मते दूर जातील, हे मी सुरुवातीलाच सांगितले होते. आता राज ठाकरे हे स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. आमच्या शुभेच्छा त्यांना आहेत.
मंत्रीमंडळ विस्ताराबद्दल बोलताना त्यांनी फार मोठी खंत व्यक्त केली. मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची चिन्हं निर्माण झाली होती. बोलणीही सुरू होती. अशावेळी अजितदादांची एन्ट्री महायुतीत झाली. त्यामुळे विस्तार थांबला आणि आमची संधी हुकली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना त्यांनी भाजपच्या काही नेत्यांच्या भूमिकेवर टिप्पणी केली. आ. नितेश राणे हे भाजपचे प्रवक्ते आहेत. ते विरोधकांना चोख प्रत्युत्तर देतात. मात्र एखाद्या समाजाच्या विरोधात अशी भूमिका घेणं चुकीचं आहे. नितेश राणे यांनी सर्वसमावेशक इमेज बनवावी असा सल्ला ना. रामदास आठवले यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 21-09-2024