‘यंग ब्लड’ विरुद्ध ‘जुने जाणते’: रत्नागिरीच्या ‘सुपर फाईट’कडे सर्वांचे लक्ष!

रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील क्रिकेट शौकिनांसाठी एका विशेष सामन्याची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. चॅम्पियन रेनी ट्रॉफी अंतर्गत, १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता प्रमोद महाजन क्रीडा संकुलावर ‘सुपर फायटर्स’ आणि ‘सुपर वॉरियर्स’ या दोन बलाढ्य संघांमध्ये एक प्रदर्शनीय सामना रंगणार आहे. पावसाची शक्यता असली तरी, सामना होणारच, असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या सामन्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नव्या आणि जुन्या खेळाडूंचा अनोखा संगम. प्रतीक साळवी यांच्या नेतृत्वाखालील सुपर फायटर्स आणि विराज साळवी यांच्या नेतृत्वाखालील सुपर वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये अनुभवी आणि तरुण दमाच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

अनुभवाची कसोटी आणि तरुणाईचा जोश

एकेकाळचे अष्टपैलू डावखुरे खेळाडू प्रवीण साळवी, फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेले गोलंदाज कुणाल सावंत, स्फोटक फलंदाज मनीष आयरे, अष्टपैलू राज चव्हाण आणि न्यू प्रेसिडेंसीचा यष्टीरक्षक म्हणून ओळखला जाणारा रजनीश परब यांसारखे अनुभवी खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. तर दुसरीकडे, अभी दुडे, दीपक माणगावकर, तेजस हळदवणेकर, यश खानविलकर आणि विभास दाभाडे (यंग ब्लड) यांसारखे नवीन खेळाडू आपल्या कामगिरीने जुन्या खेळाडूंपुढे कडवे आव्हान उभे करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नवीन खेळाडू जुन्या खेळाडूंपुढे कसा कस लावतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

रत्नागिरीकरांना उत्सुकता…

या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले असून काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ते उत्सुक आहेत. मनीष आयरे यांची बॅट पुन्हा तळपणार का? कुणाल सावंत आपल्या गोलंदाजीने पुन्हा एकदा आग ओकणार का? तसेच, यष्टीरक्षक रजनीश परब पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्याच्या सामन्यात मिळणार आहेत. त्याचबरोबर, नवीन खेळाडूंना सोबत घेऊन अभी दुडे कोणती रणनीती आखणार, याकडेही सर्वांचे लक्ष असेल.

दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे. हा क्रिकेटचा थरार अनुभवण्यासाठी रत्नागिरीतील क्रिकेटप्रेमी प्रमोद महाजन संकुलावर मोठ्या संख्येने गर्दी करतील, यात शंका नाही.

संघ खालीलप्रमाणे:

सुपर फायटर्स: १. प्रतीक साळवी (कर्णधार/अष्टपैलू) २. अभी दुडे (अष्टपैलू) ३. प्रवीण साळवी (अष्टपैलू) ४. रोहित मायनाक (गोलंदाज) ५. शुभम सावंत (गोलंदाज) ६. कुणाल सावंत (गोलंदाज) ७. प्रथमेश साळवी ८. लोभस देसाई ९. सर्वेश शेलार १०. किरण कामतेकर ११. दिपक माणगावकर १२. महेश सामंत

सुपर वॉरियर्स: १. विराज साळवी (कर्णधार/अष्टपैलू) २. तेजस हळदवणेकर (अष्टपैलू) ३. सुजित साळवी (फलंदाज) ४. सौरभ झापडेकर (फलंदाज) ५. शुभम सावंत (गोलंदाज) ६. राज चव्हाण (अष्टपैलू) ७. मनीष आयरे (फलंदाज) ८. विभास दाभाडे ९. विराज दाभाडे १०. आराध्य वर्तक ११. यश खानविलकर (गोलंदाज) १२. रजनीश परब