रत्नागिरी : जिल्ह्यात अद्यापही पूर्ण क्षमतेने मासेमारी नाही!

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी १५ ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेने सुरू होते. मात्र, या वर्षी हा मुहूर्त टळला आहे. हवामान केंद्राने १६ ते ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याचा इशारा दिल्याने मासेमारी नौका समुद्रात गेल्या नाहीत.

पावसाळी मासेमारी १ ऑगस्टपासून संपुष्टात आल्यानंतर मासेमारी नौका समुद्रात जाऊ लागल्या. जिल्ह्यात सुमारे २ हजार ८०० मासेमारी नौका असून पहिल्या दिवशी २५ ते ३० टक्केच मासेमारी नौका मासेमारीसाठी समुद्रात गेल्या. त्या दिवशीही समुद्रातील वातावरण मासेमारीसाठी पोषक नसल्याने बहुसंख्य नौका मासेमारी न करताच बंदरावर परतल्या होत्या. त्या नंतर काही दिवस पाऊस कमी झाला होता त्यावेळी पुन्हा मासेमारी सुरु झाली. परंतु, ही मासेमारी पूर्ण क्षमतेने होत नव्हती.

दरवर्षी १५ ऑगस्टपासूनच बहुसंख्य मासेमारी नौका समुद्रात जातात. या दिवसापासून बंदरावरील सहकारी संस्थांचे डिझेल पंप सुरु होतात. या वर्षी मात्र हा मुहूर्त टळला आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी समुद्र खवळलेला होता. त्यामुळे फारच कमी नौका मासेमारीसाठी समुद्रात गेल्या. त्यानंतर आता हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला असल्याने मासेमारी नौका बंदरातच उभ्या आहेत. राज्यात १६ ते २१ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीसह वादळीवाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून ५० ते ६० कि. मी. वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडून मच्छीमार सहकारी संस्थाना हा धोका कळवण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 19/Aug/2025