राजापूर : राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे रावणाचा माळ येथील प्रागैतिहासिक कालीन कातळशिल्प हे संरक्षित स्मारक म्हणून उदयाला येण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १३ ऑगस्ट रोजी अधिसूचना प्रसूत करून आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत त्यासाठी हरकती वा सूचना मागवल्या आहेत.
महाराष्ट्रातील प्राचीन स्मारके व पुराण वस्तू शारणविषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० अन्वये ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हे कातळशिल्प राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या दृष्टीकोनातून विहित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.
तालुक्यातील देवाचेगोठणे येथे सर्व्हे नं. १६५/१ या मुकुंद वासुदेव आपटे व गोबिंद शंकर आपटे यांच्या जमीन मिळकतीत हे कातळशिल्प आढळले आहे. या कातळशिल्पात मनुष्यकृती दर्शवण्यात आली आहे.
प्रागौतिहासिक काळातील मानवाने निर्माण केलेली ही कलाकृती व उथळ शिल्प कोरण्यात आलेले आहे. चुंबकीय विस्थापनाच्या क्षेत्राच्या अस्तित्यामुळे या कातळशिल्पाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे या विभागाने स्पष्ट केले आहे. संरक्षित करावयाच्या जागेचे स्मारकासह एकूण क्षेत्रफळ ८० चौरस मीटर आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना जारी करण्यात आली असून उक्त स्मारकात हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला दीन महिन्यांच्या आत संबंधित स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या घोषणेला हरकत घेता येणार आहे. याबाबतची हरकत अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्यविभाग, मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई येथे नोंदवण्यात आल्यास त्याबाबत राज्य शासनाकडून विचार केला जाईल असे
कळवण्यात आले आहे.
पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने या प्राथमिक अधिसूचनेची प्रत स्मारकाजवळ ठळक ठिकाणी लावण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेत. कोकणातील सड्यांवर अनेकविध कातळशिल्पे आढळून आलेली आहेत. यासाठी रत्नागिरीतील सुधीर रिसबुड व राजापूरमधील दादा मराठे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोठे योगदान आहे. देवाचे गोठणे येथील हे कातळशिल्प चुंबकीय शक्तीमुळे विज्ञानप्रेमींनाही आकर्षित करत आहे. या कातळशिल्पाला राज्य संरक्षित दर्जा प्राप्त झाल्यानंतर ते अनेकांसाठी अभ्यासासाठी महत्वाचे ठरणारे आहे.
वैशिष्ट्ये: येथे जांभा दगडावर विविध आकार कोरलेले आहेत, जे आदिमानवाच्या कलेचा आणि संस्कृतीचा भाग मानले जातात.
महत्त्व : ही कातळशिल्पे ऐतिहासिक आणि पुरातात्विकदृष्ट्या महत्वाची मानली जातात, कारण ती मानवी वस्ती आणि कलेचा इतिहास उलगडण्यास मदत करणारी आहेत. रावणसड्यावरील कातळशिल्प विशेष प्रसिद्ध आहे. या परिसरात होकायंत्राचे काम व्यवस्थित करत नसल्याचे दिसून आलेले आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 19/Aug/2025












