टीम इंडियाचा युवा आणि डॅशिंग विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याने 20 महिन्यांच्या कमबॅकनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शानदार शतकी खेळी केली आहे. पंतने बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवशी शतक ठोकलं.
पंतने या शतकी खेळीसह माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंह धोनी याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. पंत टीम इंडियाकडून सर्वाधिक शतकं करणारा संयुक्तरित्या पहिला विकेटकीपर ठरला आहे. पंतच्या या खेळीमुळे टीम इंडियाने 450 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे.
बांगलादेशकडून शाकिब अल हसन भारताच्या डावातील 55 वी ओव्हर टाकत होता. पंतने या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर 2 धावा घेत शतक पूर्ण केलं. पंतच्या या शतकानंतर उपस्थित चाहत्यांनी उभे राहत त्याचं अभिनंदन केलं. तर ड्रेसिंग रुममधील सहकाऱ्यांनी पंतला स्टँडिंग ओवेशन दिलं. पंतच्या कसोटी कारकीर्दीतील हे सहावं शतक ठरलं. पंतने 124 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने आणि 81.45 च्या स्ट्राईक रेटने ही शतकी खेळी केली.
पंत टीम इंडियासाठी कमी डावात 6 शतकं करणारा पहिला फलंदाज ठरलाय. पंतने याबाबत महेंद्रसिंह धोनीला मागे टाकलं आहे. पंतने अवघ्या 58 डावांमध्ये हे सहावं शतक केलंय. तर दोनीने 144 इनिंग्समध्ये 6 शतक पूर्ण केलं. तर ऋद्धीमान साहा याने 54 डावात 3 शतकं केली आहेत.
शुबमन गिलसोबत निर्णायक भागीदारी
दरम्यान टीम इंडियाने पहिल्या डावात 376 धावा केल्यानंतर बांगलादेशला 149 वर गुंडाळलं. त्यामुळे टीम इंडियाला 227 धावांची आघाडी मिळाली. मात्र भारताची दुसऱ्या डावात अपेक्षित सुरुवात झाली नाही. रोहित 5, यशस्वी 10 आणि विराट 17 धावा करुन आऊट झाल्याने टीम इंडियाची 3 बाद 67 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर गिल-पंत जोडीने टीम इंडियाचा डाव सावरत दुसऱ्या दिवशी एकही विकेट गमावू दिली नाही. तर तिसऱ्या दिवशी अप्रतिम सुरुवात करुन दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी करुन भारताला मजबूत स्थितीत आणून ठेवलं.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:13 21-09-2024