हृदयद्रावक घटना : प्रेयसीचा खून करून मृतदेह आंबा घाटात फेकला

रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका नापत्ता युवतीचा शोध घेताना तिच्या प्रियकरानेच तिची हत्या करून मृतदेह आंब्याच्या दरीत फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत आरोपीला अटक केली आहे.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिनांक २१/०८/२०२५ रोजी एका नापत्ता युवतीची तक्रार दाखल करण्यात आली होती. तिचा शोध घेत असताना, तिच्या कुटुंबीयांनी तिचा प्रियकर दुर्वास दर्शन पाटील, रा. वाटद खंडाळा, यानेच तिचे अपहरण केले असावे अशी शंका व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी दुर्वास पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी संशयित आरोपी दुर्वास पाटील याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने केलेल्या तपासामुळे त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, दिनांक १६/०८/२०२५ रोजी सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने कट रचून आपल्या प्रेयसीची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिची विल्हेवाट लावून मृतदेह आंब्याच्या दरीमध्ये फेकून दिला.
आरोपीच्या कबुलीनुसार, पोलिसांनी ट्रेकर्सच्या मदतीने आंब्याच्या दरीतून युवतीचा मृतदेह बाहेर काढला. पुढील तपासात दुर्वास पाटील आणि त्याचे दोन साथीदार यांनी कट रचून ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विवेक पाटील हे करत आहेत.