Ratnagiri : २,५०० एसटी बसचे आरक्षण हाऊसफुल्ल!

रत्नागिरी : कोकणात लाडक्या गणरायाचे वाजत-गाजत घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांना परतीचे वेध लागत असते. गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागातून २ हजार ५०० एसटी बसेसची सोय करण्यात आली होती.

या सर्व बसेसचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी कोकणातून एसटी बसेस मुंबईच्या दिशेने रवाना होणार असत. त्यासाठी रत्नागिरी विभाग सज्ज झाला आहे. उत्सवाचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने एसटी बसेसच्या आरक्षणाला मागणी वाढली आहे. रत्नागिरी विभागआणखी काही बसेस वाढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले.

गणेशोत्सवानिमित्त मुंबई, पुण्यासह अन्य शहरात काम करणारे लाखो भाविक कोकणात दाखल झाले आहेत. त्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने ५ हजार २०० बसेस तसेच रेल्वे, खासगी बस, चारचाकीने कोकणातील आपले गावी गाठली. मोठ्या भक्तीमय वातावरणात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. दीड दिवसाच्या गणपतीचे मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढून निरोप देण्यात आला. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटीच्या रत्नागिरी विभागातून २ हजार ५०० एसटी बसेस सोडण्यात येणार आहे. त्याचे आरक्षण २२ जुलैपासून सुरूवात झाले.

दरम्यान, शनिवारपर्यंत सर्वच्या सर्व २,५०० एसटी बसेसचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले असून आणखीन एसटी बसेसची मागणी वाढली आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून आणखीन काही बसेस वाढवण्याच्या विचारात रत्नागिरी एसटी विभाग असल्याचे सांगण्यात आले.

अन् गणेशभक्तांनी घेतला सवलतीचा लाभ…
गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी ७५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ६५ वर्षपिक्षा जास्त वय, महिलांना तिकीटात ५० टक्के सवलत देण्यात आली होती त्याचा लाभ गणेशभक्तांनी तिकीट काढून घेतला आहे तर १५१ कि.मी. पेक्षा जास्त अंतरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीटात १५ टक्के सूट देण्यात आली त्याचा ही लाभ घेतला असल्याचे सांगण्यात आले.

या एस.टी. आगाराचे आरक्षण फुल्ल…
रत्नागिरी आगारासह मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, देवरूख, लांजा, राजापूर या आगारातील सर्वच जादा एसटी बसेसचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे.

परतीच्या प्रवासासाठी गणेशभक्तांचा सुखकर प्रवास व्हावा म्हणून २,५०० एसटी बसेस सोडण्याचे नियोजन केले होते. आरक्षणास चांगला प्रतिसाद मिळाला असून सर्वच एसटी बसेसचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. अजून चार दिवस शिल्लक असून मागणी वाढल्यास एसटी बसेस वाढवण्याचा विचार करू. – प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:39 PM 01-Sep-2025