sangameshwar : रस्त्याचे काम न झाल्यास ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

कडवई : संगमेश्वरमधील संभाजीनगर येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवेदने, अर्ज, निवेदनपत्रे देऊनही रस्ता दुरुस्तीकडे कोणतीही दखल न घेतल्यामुळे येत्या ग्रा.पं., पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

हा रस्ता पूर्णपणे खड्यांनी भरलेला असल्याने स्थानिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा, अवघ्या ५०० ते ६०० मीटर लांबीचा हा रस्ता आजही लाल मातीचा कच्चा रस्ता असून त्यात मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. पावसात वाहून गेलेल्या दगडांमुळे रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या मार्गावरून वाहनाने किंवा पायी जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रणच ठरले आहे.

संभाजीनगरमध्ये सुमारे ५०० हून अधिक लोकवस्ती आहे. याच वस्तीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह असून येथे ५० ते ६० विद्यार्थी राहतात. या रस्त्याशिवाय अन्य पर्यायी मार्ग नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह शाळकरी मुले, रुग्ण, वयोवृद्ध यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

संभाजीनगरमध्ये जवळपास ५०० मतदार आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पक्षनेते व स्थानिक पुढारी रस्ता होईल, अशी आश्वासने देतात; मात्र गेल्या ५०-६० वर्षात प्रत्यक्षात कोणतेही काम झालेले नाही. यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात पावसामुळे रस्त्यावरील परिस्थिती अधिकच बिकट केली आहे. गणेशमूर्तीचे विसर्जन करताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

Amey jwelrs

रस्ता नाही, तर मतदान नाही
याबाबत ग्रामस्थांनी एकमुखाने ठराव करून सांगितले आहे की, रस्ता पक्का झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नाही. शासनाकडून मिळणाऱ्या फुकट आश्वासनांना आता फसणार नाही. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जि.प. निवडणुकांवर बहिष्कार अटळ आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर शासन आणि प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 02-Sep-2025