Ratnagiri : जिल्ह्यात तीन वर्षांत आढळले ५२५ डेंग्यूचे रुग्ण

रत्नागिरी : पावसाळा आला म्हणजे साथीचे रोग मोठ्या प्रमाणात डोके वर काढत असतात. रत्नागिरी जिल्ह्यातील सिव्हिल रुग्णालयात २०२३ ते २०२५ या तीन वर्षांत ५२५ रूग्ण आढळले असून एकाचा ही मृत्यू झालेला नाही. जिल्हा सिव्हिल रुग्णालयासह विविध ठिकाणी उपचार घेऊन रुग्ण बरे झाले आहेत. १२ रुग्ण मलेरियाचे आढळले आहेत, कावीळ, स्वाईन फ्लूचे एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान, यंदाच्या वर्षी पावसाळ्यात आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे आठ महिन्यांत १५ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. तर पावसाळ्यात तीन महिन्यांत ६ रुग्ण आढळले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सध्या तापाचे रुग्ण वगळता साथीच्या आजारांची संख्या कमी असल्याचे सांगण्यात आले.

कोकणात मागील तीन महिन्यांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच आहे. काहीकाळ उसंत घेतल्यानंतर जिल्ह्यात सर्दी, खोकला, मलेरिया, गॅस्ट्रो, ताप यासह विविध सार्थीचे आजार पसरले होते. त्यामुळे रुग्णालयात गर्दीच गर्दी दिसून आली. मुंबई, पुणेसह अन्य मोठ्या शहरांत डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांनी डोके वर काढले होते. जिल्ह्यात ही आठ महिन्यांत १५ रुग्ण आढळले होते. मात्र बरे होऊन ते घरी परतले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात आल्यामुळे विविध ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी काहींना हिवताप, ताप, सर्दी, डोके दुखीचा त्रास होता. त्यांना औषधे ही देण्यात आली होती.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात २०२३ एकूण ४७५ जणांचे संशयित रुग्णांचे सॅम्पल घेण्यात आले, त्यातील २३९ पॉझिटिव्ह, २०२४ साली ७९९ सॅम्पल घेण्यात आले, तर २७६ पॉझिटिव्ह, जुलै २०२५ पर्यंत ५३ जणांचे सॅम्पल घेण्यात असून ११ जण पॉझिटिव्ह आढळले. मागील तीन वर्षांत साथीचे आजार पाहता आतापर्यंत ५२५ डेंग्यूचे, १२ मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबरनंतर पाऊस कमी होत जातो. त्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे, योग्य आहार, व्यायाम करावे, लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना दाखवावे असे केल्यास साथीचे आजार वाढणार नाहीत.

ही आहेत डेंग्यूची लक्षणे
अंगात तीव्र वेदना, ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, रक्तस्त्रावाची लक्षणे, तर मलेरियाची लक्षणे थंडी वाजून ताप येणे, घाम येणे अशी लक्षणे आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण कमी आहेत. पॉझिटिव्ह आलेले उपचार घेऊन बरे झाले आहेत. साथीचे आजारांची संख्या कमी झाली आहे. तरीही नागरिकांनी सतर्क राहावे, तापासह अन्य लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवावे- विकास कुमरे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 03-Sep-2025