Sangameshwar : कडवई वाणीवाडीत स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नदीतून प्रेत नेण्याची वेळ

संगमेश्वर : तालुक्यातील कडवई येथील वाणीवाडी बाजारपेठ येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने येथील ग्रामस्थांना अंत्यविधी करताना अक्षरशः मृत्यूशी सामना करावा लागत आहे. नदीतून प्रेत नेण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. गेली सत्तर वर्षे ही पारंपारिक स्मशानभूमी विकासापासून वंचित राहिली असल्याने येथील ग्रामस्थ आत्ता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

कडवई वाणीवाडी, बाजारपेठ तसेच समर्थनगर या भागातील लोकांना अंत्यविधीसाठी कडवई तुरळ मार्गाच्या लगत नदीच्यापलीकडे एक स्मशानभूमी आहे. गेली सत्तर वर्षांपासून येथील ग्रामस्थ या पारंपरिक स्मशानभूमीत अंत्यविधी करत आहेत. मात्र या स्मशानभूमी कडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने फार मोठी अडचण होत आहे. पावसाळ्यामध्ये तर मोठ्यापाण्यातून कसरत करत शव न्यावे लागत आहे. अनेकवेळा मुसळधार पाऊस असताना येथील तरुण मानवीसाखळी करून प्रेत नेत असताना काही लोक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून येथील तरुणांच्या प्रसंगावधनाने अनर्थ टळत आहे.

यापूर्वी या स्मशानभूमीच्या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित होता. आता हा वाद येथील ग्रामस्थांनी सामोपचाराने सोडवला आहे. मात्र येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय होत आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता व पूल व्हावा यासाठी येथील ग्रामस्थ अनेकवर्षे प्रशासनाशी पत्रव्यवहार करत आहेत. मात्र यापूर्वी हा वाद न्यायालयात असल्याचे कारण सांगून या प्रस्तावांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात होत्या. मात्र आत्ता हा वाद संपला असून प्रशासनाने या बाबीकडे विशेष लक्ष घालून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता व पूल बांधण्यासाठी तरतूद करून ग्रामस्थांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवावा अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा नाईलाजाने रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या पवित्र्यात येथील ग्रामस्थ आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 03-Sep-2025