maharajswa Abhiyan : जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून होणार महाराजस्व अभियानाला प्रारंभ

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत ‘सेवा पंधरवडा’ राज्यात यशस्वीपणे राबविण्याच्या अनुषंगाने महसूल मंत्र्यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे. ही बाब विचारात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सेवा पंधरवड्यात राबवावयाचे उपक्रम यापूर्वीपासून राबविले जात असून, निरंतर राबविले जाणार आहेत. मात्र, या कालावधीत ते उपक्रम मोहीम स्वरूपात युद्धपातळीवर राबविले जाणार आहेत.

‘सेवा पंधरवडा’ कालावधीमध्ये प्रत्येक दिवशी समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयामार्फत विशेष मोहीम कार्यक्रम / उपक्रम / शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात पाणंद रस्तेविषयक मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात राबविण्यात येणार आहे. ‘सर्वांसाठी घर’ हा उपक्रम २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या काळात राबविण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या तिसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी यांनी स्थानिक गरजा, भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अधिकाधिक ‘नावीन्यपूर्ण उपक्रम’ राबवावेत, असे शासनाने सूचित केले आहे. या तीनही टप्प्यांत करावयाच्या गोष्टींबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार संबंधित शासकीय यंत्रणांना सोमवारी (दि. १) मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 03-Sep-2025