रत्नागिरी : राज्य शासनाने केंद्रप्रमुख पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पदोन्नतीने ५० टक्के आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ५० टक्के पदभरती करण्यात येणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात रिक्त असलेली केंद्रप्रमुखांची १८७ पदे भरण्यास चालना मिळणार आहे.
राज्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत केंद्रप्रमुख या पदाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पदास आता समूह साधन केंद्र समन्वयक असे संबोधले जाणार आहे. मात्र, या नामांतरास महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटनेने जोरदार विरोध केला आहे.
जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची एकूण २५१ पदे मंजूर असून, ६४ पदे कार्यरत आहेत, तर १८७ पदे रिक्त आहेत. अनेक केंद्रप्रमुखांकडे तीन ते चार केंद्रांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कामकाजाचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच शासनाच्या विविध शैक्षणिक व इतर योजनांची अंमलबजावणी केंद्रप्रमुखांमार्फत होत असते. त्यावेळी त्यांची ओढाताण होत असल्याने रिक्त असलेली पदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी केंद्रप्रमुख संघटनेकडून होत आहे.
राज्यात केंद्रप्रमुख म्हणजेच केंद्र समन्वयकांच्या ४ हजार ८६० पदाची लवकरच भरती केली जाणार असून, ५० टक्के पदोन्नती आणि ५० टक्के स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पदभरती करण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार, केवळ पदनामात बदल करण्यात आला असून, केंद्रप्रमुख पदासाठी लागू असलेली अर्हता आणि नेमणुकीची पद्धत तशीच कायम राहणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनाचे विविध प्रकारचे ऑनलाइन उपक्रम सुरू असल्याने गुणवत्तेचा खेळखंडोबा चालू आहे. प्रशिक्षण संस्था तथा डायट विभाग, रत्नागिरीकडील उपक्रमांच्या बाबतीत संघटना धोरणात्मक निर्णय घेणार आहे.- बाबाजी शिर्के, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटना, रत्नागिरी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:37 PM 03-Sep-2025











