रत्नागिरी : शासनातर्फे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी दि. ३० सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करण्याच्या सूचना पालकांना करण्यात आल्या आहेत. दि. ३० सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण केलेले व यु डायसवर नोंद असलेल्या विद्यार्थ्यांचीच संख्या ग्राह्य धरली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यात आधार प्रमाणीकरणाचे काम ९७.३८ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करत आहेत. शिक्षक पालकांकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. काही पालकांनी मुलांच्या जन्माची नोंद वेळेत केली नसल्यामुळे जन्मदाखल्यासाठी अडचण निर्माण होत आहे. आधार प्रमाणीकरणासाठी आधार केंद्रावर पालक, विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. पालक पाल्यांना घेऊन आधारकार्ड काढणे, प्रमाणीकरण करण्यासाठी आधारकेंद्रावर जात असल्याने तेथे होणारी गर्दी लक्षात घेता महिनाभरात काम पूर्ण होणे अशक्य आहे.
शासकीय योजनांना मुकावे लागणार
ज्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण होणार नाही त्यांना शिष्यवृत्ती, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, सायकल योजना, तसेच इतर आर्थिक लाभापासून मुकावे लागणार आहे.
आधार दुरुस्ती करावी कशी?
मुलांच्या आधारकार्डवरील नाव, जन्मतारीख, पत्ता किंवा अन्य माहितीमध्ये दुरुस्ती आधार केंद्रावर जाऊन करावी लागणार आहे.
चार हजार विद्यार्थ्यांचे प्रमाणीकरण नाही
जिल्ह्यातील एक लाख २७ हजार १२६ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले असून, अजून चार हजार १६८ विद्यार्थी शिल्लक आहेत.
संचमान्यतेचा तिढा
आधार प्रमाणीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांची नोंद संचमान्यतेसाठी घेतली जाणार नसल्याने त्याचा शाळांच्या संचमान्यतेवर परिणाम होऊन मान्यता धोक्यात येऊ शकते.
आधार प्रमाणीकरण नेमके कशासाठी?
शाळांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची अचूक संख्या निश्चित करण्यासाठी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आली आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यांचा आधार 3 क्रमांक यु-डायस प्लस पोर्टलवर प्रमाणित केल्याने बोगस विद्यार्थी संख्येला आळा बसला आहे. शिवाय शासकीय योजनांचा लाभ केवळ नोंदणीकृत व पात्र विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 04/Sep/2025












