Mandangad : आंबडवे-राजेवाडी महामार्ग काम मंद गतीने

मंडणगड : तालुक्यामधील आंबडवे ते महाड राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचे काम स्थानिकांच्या सूचनांसह लवकर पूर्ण व्हावे या प्रतीक्षेत आता तालुकावासीय आहेत. मागील सात-आठ वर्षांपासून या महामार्गाचे काम धिम्या गतीने प्रगतिपथावर आहे. मोठ्या कालावधीत सुरू असलेल्या महामार्गाच्या या कामांमुळे प्रवाशांसह नागरिकांना मार्गावरील अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे किमान या बांधकाम हंगामात या मार्गाचे काम पूर्णत्वाकडे जाण्याच्या अपेक्षांनी या प्रकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंबडवे-लोणंद हा तालुक्यातून जाणारा एकमेव राष्ट्रीय महामार्गातील आंबडवे ते राजेवाडी दरम्यानचे रस्त्याचे नूतनीकरण काँक्रिटीकरणाने होत आहे. हे अंतर सुमारे साठ किमी असून कामाची सुरुवात २०१७-१८ साली करण्यात आली. मात्र अनेक कारणांनी कामाला मोठ्या कालावधीने विलंब होत असल्याने महामार्गाचे काम बहुचर्चित झाले, या कामासंदर्भात अनेक वेळा अनेकांनी आंदोलनात्मक भूमिकाही घेतली. गत सहा ते सात वर्ष हा प्रकल्प केंद्र शासनाच्या अखत्यारित असतानाही रखडला, त्यामुळे कामाच्या वेगाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याचबरोबर मार्गाच्या कामादरम्यान खड्डे व नादुरुस्त रस्त्यामुळे प्रवासी, वाहनधारकांचे हाल होत आहेत.

नूतनीकरणाने या मार्गाच्या अंतरातील आजूबाजूच्या परिसरात सुबत्ता निर्माण होईल यात शंका नाही, दरम्यान, पर्यटनाबरोबर, दळणवळणासाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरेल. मात्र भविष्यकालीन वाढती रहदारी आणि लोकवस्ती, वाढते शहरीकरण लक्षात घेवून मार्गाच्या कामाचा चांगला दर्जा असावा यासाठी येथील नागरिक आग्रही आहेत. नूतनीकरणात स्थानिकांची मागणी, भौगिलक रचना यांचा विचार करण्यात यावा, अशा मागणीला जोर धरला आहे. मार्गाची निर्मिती होत असताना अनेकठिकाणी रस्ते वाहतूक सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे का. रस्त्यामधील अनेक धोकादायक
वळणे, चढ-उतार अनेक ठिकाणी तशीच ठेवण्यात आलेली आहेत. भविष्यकालीन विचार व मार्गात असलेले दोष काढून सुस्थितीत नव्याने मार्ग निर्मितीची महामार्ग प्राधिकरणाची ख्याती असते. त्या गुणवत्तेत या मार्गाची निर्मिती करणे गरजेचे आहे.

भविष्यात अनेक समस्या निर्माण होवून स्थानिकांना त्यांना सामोरे जावे लागणार नाही याची दक्षता आताच घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. रस्त्याच्या बाजूने उभारण्यात आलेल्या गटारांमधील सांडपाण्याचा निचरा कोठे होणार आहे, या प्रश्नांचे उत्तर मिळालेले नाही. तालुक्यातील भिंगळोली येथे हा प्रश्न उपस्थित होतो.

त्यामुळे कामाची गुणवत्ता व कामाची गती यांचा समन्वय साधून लवकर काम करण्याच्या मागणीला जोर आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदारांकडून येथील भौगोलिक परिस्थितीचे अवलोकन करून गुणवत्तापूर्ण कामांची अपेक्षा गैर नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 05/Sep/2025