रत्नागिरी : खरीप हंगामातील पिकांची ई पीक पाहणी नोंद १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी ई -पीक पाहणी अप्लिकेशनचा वापर करून करणे गरजेचे असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभाग, कृषि विभाग व ग्रामविकास विभाग यांची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. सदर बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह महसूल, कृषि व ग्राम विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अॅग्रीस्टॅक व इतर योजनांचा सखोल आढावा घेतला. तसेच अॅग्रीस्टॅक योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महसूल, कृषि व ग्रामविकास विभाग यांना प्रत्येक गावात कॅम्प आयोजित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
त्या अनुषंगाने पुढील ८ ते १० दिवसांत पूर्ण जिल्ह्यामध्ये सदर कॅम्पचे आयोजन करण्याबाबत मार्गदर्शन केले. केंद्र सरकारमार्फत जनसमर्थ केसीसी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. या पीक कर्जाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी कृषी विभागास संपर्क साधावा, असे आवाहन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 05/Sep/2025












