Ganesh Murti : कापडगाव येथील भाटलेकरवाडीत ३२ कुटुंबांचा एक गणपती

पाली : रत्नागिरी तालुक्यातील कापडगाव येथील भाटलेकरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाचा गणेशोत्सव ३२ कुटुंबे एकत्र साजरा करतात. त्यामुळे ३२ कुटुंबांचा एक गणपती अशी ओळख निर्माण झालेली आहे तसेच यातून सामाजिक ऐक्याचा आगळावेगळा संदेशही त्यांनी दिला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रामीण भागात समाजप्रबोधन व सामाजिक ऐक्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी रोवली. समाजाला एकत्र आणून सामाजिक व देशहिताचे कार्य करण्यासाठी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्याच धर्तीवर कापडगाव भाटलेकरवाडी येथील बुजुर्ग मंडळींनी एकत्र येऊन कोकणात आपल्याकडे असलेल्या घरगुती गणेशोत्सवापेक्षा आपले सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी वाडीतील सर्व कुटुंबांचा एकत्रित असा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून एक भावी पिढ्यांसाठी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ही परंपरा अनेक वर्षांपूर्वीची आहे. गेल्या काही वर्षांमध्ये केवळ गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची स्पर्धा अन्य मंडळांमध्ये लागली आहे.

या मंडळाने या स्पर्धेपासून दूर राहणे पसंत केले आहे. या मंडळाने ग्रामीण भागात असूनही उत्सवाला सामाजिक कार्याची जोड दिलेली आहे. त्यात पारंपरिक भजन, जाखडी नृत्य, महिला व लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असे पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम मंडळात राबवण्यात येतात त्याचबरोबर मंडळाने सामाजिक दायित्वाच्या जबाबदारीतून समाजातील गरजू व्यक्तींना मदत व शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना साह्य केले आहे.

उत्सवाची परंपरा कायम
पूर्वीपासून भाटलेकरवाडीतील ३२ कुटुंबे ११ दिवस एकत्र येऊन एकोप्याने गणेशोत्सव साजरा करत आले आहोत. श्री भाटलेकरवाडीच्या राजाच्या उत्सवाची परंपरा आजही कायम आहे, असे प्रकाश कोत्रे, दिलीप कोत्रे, संदीप कोत्रे, शशिकांत कोत्रे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 05/Sep/2025