Ratnagiri : जिल्ह्यात 24 हजार जणांचे रेशन बंद होणार?

रत्नागिरी : सलग सहा महिने रेशनवरील धान्याची उचल न केलेल्या जिल्ह्यातील 10 हजार 221 रेशनकार्डवरील 24 हजार जणांचे रेशनवरील धान्य बंद होण्याची शक्यता आहे. या व्यक्तींचे धान्य प्राधान्य योजनेतील प्रतीक्षा यादीतील कार्डधारकांना दिले जाणार असून, त्यापूर्वी पुन्हा एकदा या सर्वच लाभार्थ्यांची पडताळणी होवून योग्य ती कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, डिसेंबर 2024 ते मे 2025 च्या कालावधतील राज्यातील 3 लाख 33 हजार 881 रेशनकार्डवरील 8 लाख 73 हजार 063 इतक्यांनी धान्य उचललेले नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

रेशनकार्ड धारकांना मोफत दिल्या जाणाऱ्या धान्याचा अनेकजण गैरवापर करत असल्याचे काही प्रकार समोर आल्याने या योजनेचे लाभार्थी असूनही धान्य उचलत नाहीत. अशा ग्राहकांचे धान्य बंद करून ते इतर प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना देण्यात यावे, असे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने ई-पॉस मशिनवरून वितरित माहितीच्या आधारे सलग गेल्या सहा महिन्यात धान्याची उचल न केलेल्या 10 हजार 221 कार्डावरील 24 हजार 03 जणांची यादी तयार केली आहे. या यादीच्या आधारे, संबंधितांची खात्री, पडताळणी करून घेण्यात येईल. त्यानंतर या सर्वांचे धान्य बंद केले जाणार आहे. त्यामुळे प्रतिक्षेत यादीवर असलेल्या लाभार्थ्यांना हे धान्य मिळण्याची शक्यता आहे.

इतके धान्य मिळते..
केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सर्व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड 35 किलो धान्य आणि प्राधान्य योजनेतील प्रतिसदस्य पाच किलो मोफत धान्य दिले जाते. केशरी कार्डधारकांना याचा लाभ मिळतो. शहरी भागातील कार्डधारकांसाठी वार्षि 59 हजार रूपये तर ग्रामीण भागातील कार्डधारकांसाठी 44 हजार रूपये वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे. त्यानुसार दरवर्षी प्राधान्य योजनेतील अनेक लाभार्थी धान्य मिळावे प्रतीक्षेत असतात.

जिल्ह्यात अद्याप पावणेतीन लाख ई-केवायसी नाही
रत्नागिरी जिल्ह्यात 31 जुलै अखेर मुदत देवून ही रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी करून घेतली नाही. जिल्ह्यात 5 लाखांहुन अधिक जणांनी ई-केवायसी केली तर 2 लाख 70 हजार 108 कार्डधारकांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. अद्याप मुदतवाढीसंदर्भात कोणतेही आदेश नसल्यामुळे या कार्डधारकांचे धान्य बंद होण्याची शक्यता आहे.

Arihant 3

डिसेंबर 2024 ते मे 2025 पर्यंतची यादी आली होती. या रेशनकार्ड धारकांची चौकशी करून त्या त्या योजनेमध्ये लाभार्थ्यांना बसवले आहे. लाभार्थी धान्य घेत आहेत. आता नवीन अपडेट यादी आलेली नाही-रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:46 PM 05/Sep/2025